गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेने क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आयपीएलच्या सामन्यांना मिळणारी प्रसिद्धी पाहता, बीसीसीआय आगामी ३ वर्षांमध्ये महिला आयपीएल सुरु करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यासंदर्भातले संकेत दिले आहेत. “आगामी २-३ वर्षांमध्ये आम्ही महिला आयपीएलचं आयोजन करण्याच्या विचारात आहोत”, मात्र यासंदर्भात अधिक कोणतीही माहिती माहिती राय यांनी प्रसारमाध्यांना दिली नाहीये.

२०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. या कामगिरीनंतर भारतात महिला आयपीएल सुरु करण्याच्या मागणीने जोर धरला होता. यासाठी २२ मे रोजी भारतीय महिला संघ विरुद्ध अन्य महिला संघातील खेळाडूंचा एक प्रदर्शनीय टी-२० सामना आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघातील महिला खेळाडू भारतीय संघाविरुद्ध सामना खेळणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार असल्याची माहिती राय यांनी दिली आहे.

भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने काही महिन्यांपूर्वी महिला आयपीएलसाठी हा योग्य काळ नसल्याचं वक्तव्य केलं होतं. आयपीएलसारखी स्पर्धा खेळण्यासाठी लागणारे प्रथमश्रेणी खेळाडू सध्या भारतीय महिला क्रिकेटमध्ये नाहीत. गेल्या काही वर्षांत भारतीय महिला संघाचे नियमीत दौरे सुरु झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आणि स्थानिक महिला खेळाडू यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे महिला आयपीएलसाठी अजुन काहीकाळ थांबण गरजेचं असल्याचं मत मिताली राजने व्यक्त केलं होतं.

Story img Loader