भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस याला अद्याप एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे जेतेपद पटकावून विजय अमृतराज (१९७७) यांच्यानंतर पहिला भारतीय टेनिसपटू बनण्यासाठी पेस उत्सुक आहे. त्यामुळे या स्पर्धेत इतिहास घडवण्यासाठी आपण खेळणार असल्याचे पेसने सांगितले.
‘‘माझ्या कारकीर्दीत या क्षणी मी फक्त यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी आणि इतिहास घडवण्यासाठी खेळत आहे. कारकीर्दीत अधुरे राहिलेले एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खेळणार आहे. माझा सहकारी राडेक स्टेपानेकबद्दल मला आदर असून त्याच्यासह खेळताना मी अनेक जेतेपदे पटकावली,’’ असेही पेस म्हणाला.
पेस-स्टेपानेक जोडीला ‘अ’ गटात अमेरिकेच्या बॉब आणि माइक ब्रायन या अव्वल मानांकित जोडीचा सामना करावा लागणार आहे. याविषयी पेस म्हणतो, ‘‘ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे जेतेपद पटकावून आम्ही मोसमाची सुरुवात थाटात केली होती. मात्र त्याच जोशात पूर्ण वर्षभर खेळणे कठीण असते. मात्र आमची सध्याची कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळे कोणत्याही जोडीला पराभूत करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.’’ प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा