नवी दिल्ली : अनेक स्पर्धा खेळलो, पण कधी वेदनांमुळे इतका असह्य झालो नव्हतो. आशियाई स्पर्धेत पाठीचे दुखणे विसरून अंतिम फेरीपर्यंत जिद्दीने प्रवास करणाऱ्या एच. एस. प्रणॉयने अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.

चाहते आम्हाला जिंकताना, हरताना पहात असतात; पण यासाठी खेळाडूला कोणत्या संघर्षांतून जावे लागते हे त्यांना माहीत नसते. पुलेला गोपीचंद मला १५ वर्षे ओळखत आहेत. त्यांना माझा संघर्ष माहीत आहे. कारकीर्दीत अनेक अडचणींचा सामना केला; पण वेदनांनी कधीही इतका असह्य झालो नव्हतो, असे प्रणॉय म्हणाला.

हेही वाचा >>> World Cup 2023, IND vs AFG: रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, वनडेत सलामीवीर म्हणून झळकावले २९ वे शतक

उपांत्यपूर्व फेरीचा तो सामना खेळणे माझ्यासाठी एक स्वप्न होते. माझी शारीरिक परिस्थिती लक्षात घेता ली झी जियाविरुद्धची लढत माझ्यासाठी खूप कठीण होती. शटल्सची गती संथ होत होती. त्यामुळे प्रदीर्घ रॅलीज खेळाव्या लागल्या. पाठीवर टेपिंग आणि बेल्ट लावून मी खेळत होतो. वेदना सहन करणे आणि कामगिरी करणे मानसिकदृष्टय़ा कठीण होते. दुसरा गेम गमावला तरी मी जिद्दीने उभा राहिलो आणि विजय मिळविला. त्यानंतर गोपीचंद यांना मारलेली मिठी कधी विसरणार नाही. त्या मिठीत पुरुष एकेरीत ४१ वर्षांचा आशियाई स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवल्याचे समाधान होते, असे प्रणॉयने सांगितले.

या कामगिरीविषयी अधिक बोलताना प्रणॉय म्हणाला, दुखापतीचे सोडा, त्या नेहमीच आमच्याबरोबर असतात. त्या एक वेळ विसरता येतील; पण तमाम देशवासीयांच्या आशा होत्या. मला त्यांना निराश करायचे नव्हते. या एका विचारानेच मला कणखर केले. त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. आधी जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक आणि त्यानंतर महिनाभरात आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक मिळविले. कारकीर्दीमधील ही दोन सर्वात मोठी पदके होती. अशी कामगिरी माझ्याकडून होईल असे कधीही वाटले नव्हते.  -एच.एस. प्रणॉय

Story img Loader