भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेसला नुकतेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अतुलनीय कामगिरीचा गौरव म्हणून देण्यात आलेल्या सन्मानाच्या निमित्ताने पेसने जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या. लंडन ऑलिम्पिकच्या वेळी महेश भूपतीमुळे सर्व वातावरण खराब झाले आणि देशाची पदकाची संधी हुकली, असे उद्गार पेसने काढले. लंडन ऑलिम्पिकपूर्वी भारतीय टेनिस संघ निवडीवरून झालेल्या या तमाशामुळे वैयक्तिक संबंध महत्त्वाचे का देशहित, हा प्रश्न ऐरणीवर आला. खेळाडू आपल्या शानदार प्रदर्शनाने देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतात. मात्र ते खेळापेक्षा मोठे होऊ नयेत, हाच मुद्दा चर्चेच्या व्यासपीठावर मान्यवरांनी मांडला. पेसच्या उद्गारांसंदर्भात टेनिस या खेळाचे वैयक्तिक स्वरूप, संघटनेच्या मर्यादा, खेळाडूंची भूमिका, आचारसंहितेची गरज या विविध पैलूंवर मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. वैयक्तिक हितसंबंध, हेवेदावे बाजूला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य द्यायला हवे आणि खेळाडू खेळापेक्षा मोठा होऊ नये, हाच सूर ‘चर्चेच्या व्यासपीठावर’ अधोरेखित झाला.

लंडन ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघनिवडीच्या निमित्ताने ज्या गोष्टी समोर आल्या, त्या बाहेर येणे योग्य नाही. वैयक्तिक वादविवादांपेक्षा देशहिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. टेनिस हा वैयक्तिक स्वरूपाचा खेळ आहे. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच डेव्हिस चषक या स्पर्धाच्या वेळीच राष्ट्रीय संघटना संघ ठरवते. एरव्ही टेनिसपटूंवर संघटनेचे नियंत्रण नसते. त्यामुळे पेस-भूपती प्रकरणात संघटनेला हस्तक्षेप करण्यावर मर्यादा येतात. पेस किंवा भूपती या दोन्ही खेळाडूंची कामगिरी गौरवास्पद आहे. मात्र अहंकारामुळे त्यांच्यातले संबंध दुरावले आणि त्याचा फटका टेनिसला बसला. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी टेनिसपटूंना याचे पालन करणे अत्यावश्यक असेल. अन्य देशांमध्ये पेस-भूपतीसारखे प्रकार घडत नाहीत, कारण त्यांच्याकडे निवडीसाठी मोठय़ा प्रमाणावर दर्जेदार खेळाडू उपलब्ध असतात. पेस-भूपतीला पर्यायच उपलब्ध होऊ नयेत, हा आपला कमकुवतपणा आहे.   
सुंदर अय्यर, महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव

पेसने भूपती-बोपण्णाला दोष दिला. मात्र भूपती-बोपण्णाच्या बाजूने विचार केला तर पेसही दोषीच ठरतो. ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळायचे असेल तर काही महिने आधी एकत्र सराव करणे आवश्यक असते. नुकसान केवळ पेसचे नाही, भूपती-बोपण्णाचेही झाले आहे. चूक दोघांचीही आहे. पेस-भूपतीची एकत्रित कामगिरी अद्भुत अशी आहे. वाद टाळून ते एकत्र खेळले असते तर भारताला निश्चितच पदक मिळाले असते. खेळाडू एकमेकांत भांडत आहेत. कारण त्यांना सरकारचा, संघटनेचा काहीही पाठिंबा नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे यश मिळवले आहे, त्यामागे त्यांचे वैयक्तिक कौशल्य हा मुद्दा आहे. पेस-भूपतीच्या प्रकरणात संघटना फार काही करू शकत नाही, कारण टेनिस वैयक्तिक खेळ आहे. इतक्या वर्षांनंतरही आपण पेस-भूपतीवरच अवलंबून आहोत. दुसरी फळी तयारच झालेली नाही. खेळाडूंना शिस्त लागायलाच हवी, परंतु त्यांना घडवण्यासाठी मूलभूत सुविधा
सरकार किंवा संघटना पुरवत
नाही, हेही तितकेच खरे आहे.
भीष्मराज बाम, ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ

खेळाडू हा सैनिकाप्रमाणे असतो. कर्तव्यदक्ष राहून सर्वोत्तम प्रयत्न देणे हे त्याचे वैशिष्टय़ आहे. मात्र त्याचवेळी या व्यक्तींच्या भावभावना, आवडीनिवडी लक्षात घेणे आवश्यक असते. वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून लक्ष्य गाठणारा खेळाडूच विजेता ठरतो. प्रत्येकाला अडचणी, समस्या असतात. त्यातून मार्ग काढायचा की समस्या-अडचणींना मोठे करायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते. मानसिक कणखरता हा कळीचा मुद्दा आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा प्रदर्शनावर परिणाम होऊ न देणे हे सगळ्यात महत्त्वाचे. ऑलिम्पिक सर्वोच्च क्रीडा स्पर्धा आहे, या स्पर्धेचा विचार करताना तरी देशाचा विचार होणे आवश्यक आहे. अशावेळी काही त्याग करावा लागला तर त्यात वावगे काहीच नाही. पेस-भूपती यांनी देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. मात्र ते एकत्र खेळायला तयार नसतील तर युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी. त्यांना पेस-भूपतीप्रमाणे यश मिळणार नाही, पण त्यांना स्थिरावण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.
कमलेश मेहता, माजी टेबलटेनिसपटू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक

Story img Loader