जैव-सुरक्षित वातावरण मानसिकदृष्टय़ा थकवणारे आहे. अखेरीस खेळाडूसुद्धा माणसे आहोत. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना दोन आठवडय़ांची विश्रांती आवश्यक आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ‘आयपीएल’पासून भारतीय खेळाडूंनी विश्रांती घेतलेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यात चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश होता. आता इंग्लंडविरुद्ध भारत चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.

‘‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकांनंतर ‘आयपीएल’चा हंगाम असेल. त्यामुळे खेळाडूंना ‘आयपीएल’नंतरच विश्रांती मिळू शकेल. जैव-सुरक्षित वातावरण आणि विलगीकरण हे मानसिकदृष्टय़ा थकवणारे आहे. आम्ही माणसे आहोत म्हणून विश्रांती हवी,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

दुखापतीमुळे अक्षरची माघार

डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. राखीव खेळाडू शाहबाझ नदीम आणि दीपक चहर यांचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. यापैकी नदीमला अक्षरच्या जागी पदार्पणाची संधी मिळाली आहे.

Story img Loader