कुठलाही खेळ रुजवण्यासाठी राष्ट्रीय, राज्य तसेच तालुकास्तरावरच्या संघटनांचा मेळ असणे आवश्यक आहे. खेळाचा विकास होण्यासाठी खेळाडू केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक आहे. खेळाडूंचा बहुतांशी वेळ आणि ऊर्जा निधी संकलन, साहित्याची जुळवाजुळव, व्हिसा-पासपोर्ट अशा प्रशासकीय कामातच खर्च होतो. खेळाकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. खेळाडूला साहाय्यकारी ठरेल, अशी सहयोगी यंत्रणा निर्माण होण्याची नितांत गरज आहे, असे उद्गार अर्जुन पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने काढले.
सीसीआय आयोजित बिलियर्ड्स स्पर्धेच्या निमित्ताने पंकज बोलत होता. ‘‘देशात स्नूकर आणि बिलियर्ड्सच्या प्रसारासाठी मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा आयोजित होणे नितांत गरजेचे आहे. तूर्तास तरी या खेळांमध्ये इंग्लंडची मक्तेदारी आहे. प्रशिक्षण आणि व्यावयासिक स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लंडमध्ये स्थायिक होणे प्रत्येक खेळाडूला शक्य होईल असे नाही. यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचण्याचा मार्ग भारतीय खेळाडूंसाठी अतिशय खडतर आहे. या स्पर्धा जगभरातल्या अन्य देशांमध्ये विस्तारल्यास भारतीय खेळाडूंसाठी ते उपयुक्त ठरेल.
आयपीएलच्या धर्तीवर लीग स्वरूपाची स्पर्धा झाल्यास खेळाडूंना आर्थिक फायदा होईल तसेच खेळाचा व्यापक प्रसार होईल. आमच्या खेळाचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण वाढले तर निश्चित फायदा होईल,’’ असे पंकजने सांगितले. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे. त्यासाठी भारतातच अकादमी स्थापना करण्यासंदर्भात विचार करीत असल्याचे त्याने सांगितले. स्पर्धाची बक्षीस रक्कम वाढवण्यासाठी खेळाडूंनी एकत्र येत समाधानकारक बक्षीस रक्कम मिळणाऱ्या स्पर्धामध्येच खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

Story img Loader