फुटबॉलप्रमाणेच कबड्डी हा साधा खेळ आहे, जो कोणालाही समजू शकतो. फुटबॉलमध्ये दोन संघ, एक चेंडू आणि लक्ष्य गोलचे, तसेच कबड्डीमध्ये दोन संघ लक्ष्य रेषेचे आणि गुण मिळतो. हे या दोन खेळांमध्ये साम्य आहे. कबड्डीकडे नव्या पद्धतीने पाहिले तर, हा खेळ अधिक चांगल्या पद्धतीने साकारता येऊ शकतो. ज्यात हिंमत, मेहनत, ताकद, कसरत या सर्वाची आवश्यकता असते. हा खेळ फक्त ताकदीचा आहे असा काही मंडळींचा समज आहे. पण या खेळासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक सामथ्र्य महत्त्वाचे असते, असे ‘प्रो कबड्डी’ स्पध्रेतील ‘यु मुंबा’ संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रतिक सेन यांनी सांगितले.
‘यु मुंबाने’ आपल्या भविष्यातील संघाची बांधणी करण्यासाठी आतापासूनच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. ‘यु मुंबा फ्युचर स्टार्स चॅम्पियनशीप’ या नावाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून १८ ते २२ वयोगटातील युवा खेळाडूंची निवड करण्यात आली. धारावातील कबड्डी संकुलात मॅटवर झालेल्या या स्पध्रेला खेळाडूंचा उत्साही प्रतिसाद लाभला. यावेळी माहिती देताना सेन म्हणाले की, ‘‘प्रो कबड्डी लीगचे स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. कोणत्याही स्पध्रेचे अन्य कोणत्याही वाहिनीने प्रक्षेपण करणे आणि स्टारने करणे यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे कबड्डीला तुफानी लोकप्रियता मिळेल. कबड्डीपटू घरोघरचे तारे होतील.’’
‘‘कबड्डी हा कामकरी माणसांचा खेळ आहे. एके काळी मुंबईतील मिलकामगारसुद्धा मोठय़ा प्रमाणात हा खेळ खेळायचे. मुंबईप्रमाणे अन्य शहरांमध्येही या खेळाला तंदुरुस्तीच्या पाश्र्वभूमीवर महत्त्व दिले जाते. ‘प्रो कबड्डी’च्या माध्यमातून या खेळाला व्यावसायिकपणे पाहिले जात आहे,’’ असे सेन यांनी पुढे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Players will reach maney homes with pro kabaddi