तब्बल ९ वर्षांनी कुस्तीच्या मैदानात पुनरागमन करणारा कुस्तीपटू सुशील कुमारने नुकतचं इंदौर येथे झालेल्या कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारने मिळवलेलं हे सुवर्णपदक आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अंतिम सामन्यात पोहचण्याआधी सुशील कुमारला ५ पैकी फक्त २ फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंचा सामना करावा लागला. याव्यतिरीक्त अन्य फेऱ्यांमध्ये सुशीलच्या प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. प्रवीण, सचिन राठी आणि प्रवीण राणा या ३ कुस्तीपटूंनी मैदानात प्रवेश करत सुशील कुमारला नमस्कार करून माघार घेणं पसंत केलं.

यामुळे सुशील कुमारला अंतिम फेरीत धडक मारणं सोपं झालं. मात्र सुशील कुमारचा हा विजय बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान खानला अजिबात रुचला नाहीये. फरहानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत सुशीलला हे सुवर्णपदक न स्विकारण्याचा सल्ला दिला आहे.

फरहानच्या या ट्विटला ट्विटरवर मिश्र स्वरुपात प्रतिसाद मिळाला. काहींनी फरहानला ट्रोल करत सुशीलचं कौतुक केलं. तर काही लोकांनी फरहानचा मुद्दा योग्य असल्याचं मान्य केलं.

Story img Loader