नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूंना कशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला, आव्हानांवर मात करण्यासाठी खेळाडूंनी काय मेहनत घेतली, त्यांना प्रेक्षकांमधून कसा पाठिंबा मिळत होता हा सगळा प्रवास स्वतांत्र्यदिनी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खेळाडूं यांच्यातील संवादातून उलगडला गेला.
स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्यावरील कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी खेळाडूंशी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादाची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर तमाम भारतीयांना पॅरिस ऑलिम्पिकचा आनंद आणि रोमांचक क्षण अनुभवता आले. बॅडमिंटनपटू लक्ष्यशी पंतप्रधान म्हणाले, तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू खूप लहान होतास, आता तू वलयांकित खेळाडू बनला आहेस. यावर लक्ष्यने हो सर असे म्हणून आपला उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास उलगडला. प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी पहिल्या लढतीलाच माझ्याकडून भ्रमणध्वनी (मोबाईल) काढून घेतला आणि स्पर्धा संपल्यावर मिळेल असे सांगितले. जेव्हा मला मोबाईल मिळाला, तेव्हा मला किती पाठिंबा मिळत होता याची कल्पना आली. अर्थात, हा सगळा शिकण्याचा भाग होता, असे सांगितले. पदुकोण यांच्या शिस्तीचा धागा पकडून पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रकाशसर इतके कडक असतील, तर पुढच्या वेळेसही त्यांनाच पाठवेन.
पॅरिस ऑलिम्पिक पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यामुळे क्रीडा ग्राममधील कुठल्याही खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा नव्हती. या संदर्भात मोदींनी हसत हसत विचारले की त्या वेळी कुठल्या खेळाडूने मोदी नुसते मोठ्या गप्पा मारतात, येथे खोल्यांत साधी वातानुकूलित यंत्रणाही नाही, काय हे असे विचारले. तेव्हा एकही खेळाडू काहीच बोलला नाही. पण, मला नंतर कळले की क्रीडा मंत्रालयाने ती देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि खेळाडूंसाठी ४० प्रवासी वातानुकूलित यंत्रे पाठवून देण्यात आली. बघा सरकार तुमच्यासाठी किती प्रयत्न करते असे मोदी यांनीच सांगितले.
त्यानंतर मोदी यांनी हॉकी कर्णधार हरमनप्रीतला तुम्ही ब्रिटनविरुद्ध १० खेळाडूंसह कसे खेळलात, ते खूप कठीण होते याबाबत जरा सांगा असे विचारले. या वेळी हरमनने माहिती देताना सहाय्यक प्रशिक्षकांनी आम्हाला खूप सहाय्य केले आणि ब्रिटन संघाविरुद्ध आमचे जुने शत्रुत्व होते त्यामुळे अधिक प्रेरणा मिळाली, असे सांगितले.
या वेळी मोदी यांनी अपयशी खेळाडूंना देखील दिलासा दिला. अपयशी खेळाडूंनी निराश होण्याचे काही कारण नाही. आम्हाला तुमचाही अभिमान वाटतो. तुम्ही काही तरी शिकून परत आलात. खेळ असे क्षेत्र आहे की जेथे कुणी हरत नसतो, अशा शब्दात मोदी यांनी खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले. ऑलिम्पिकच्या आयोजनापासून, सुविधा, क्रीडा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचे तुम्ही निरीक्षण केले असेल. या संदर्भातील तुमचे अनुभव आम्हाला ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी प्रयत्न करताना उपयोगी पडणार आहेत. तुम्ही ऑलिम्पिकमधील भारताचे सैनिक आहात, अशा शब्दात सर्व खेळाडूंचा गौरव केला.
© The Indian Express (P) Ltd