भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत करत मालिकेत २-१ आघाडी घेतली आहे. ओव्हल मैदानात ५० वर्षानंतर भारताने विजय मिळवला आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं ट्वीट करत अभिनंदन केलं आहे. हा विजय आणि देशातील लसीकरण मोहीम याची सांगड घालत त्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. देशात करोना लसीकरण मोहीमेत भारतानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या ओव्हर मैदानात इतिहास रचला आहे. या दोन्ही कामगिरी एकत्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
“लसीकरणाच्या मोहिमेत आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा महान दिवस. नेहमीप्रमाणे..भारत जिंकला”, असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना व्हॅक्सिन मोफत व्हॅक्सिन असा हॅशटॅग टाकला आहे. सोमवारी दिवसभरात १ कोटीहून अधिक जणांना लस देण्याचा विक्रम केल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारताने गेल्या ११ दिवसात तिसऱ्यांदा असा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात आतापर्यंत ६९.६८ कोटी लोकांचं लसीकरण केलं आहे.
Great day (again) on the vaccination front and on the cricket pitch. As always, #TeamIndia wins! #SabkoVaccineMuftVaccine
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2021
पहिल्या डावात भारताने १९१ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने २९० धावा कर ९९ धावांची आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या डावात रोहित शर्माचं शतक आणि चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ४६६ धावांचा डोंगर रचला. तसेच इंग्लंडसमोर ३६८ धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ २१० धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने पहिल्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली होती. बर्न्सने ५० आणि हमीदने ६३ धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. भारताने हा सामना १५७ धावांनी जिंकला. भारताकडून उमेश यादवने ३, तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ गडी बाद केले.