भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दिल्लीहून रुरकीला जात असताना त्याची कार दुभाजकाला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. ऋषभची प्रकृती सध्या चांगली असून त्याच्या चेहऱ्यावर, पाठीवर जखमा तसेच गुडघ्याला दुखापत झाली आहे. दरम्यान ऋषभ पंतच्या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी ऋषभच्या आईंना फोन करून त्याच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.
हेही वाचा >>> “ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण…”, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंतच्या आईंशी फोन कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी यांनी ऋषभच्या प्रकृतीची विचारपूस केली. याआधी त्यांनी ट्वीटद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या होत्या. “ऋषभ पंतच्या अपघाताचे वृत्त ऐकून व्यथित झालो आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो,” असे ट्वीट मोदी यांनी केले होते.
ऋषभ पंतची प्रकृती कशी आहे?
ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉ. सुशील नागर यांनी त्याच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्याच्या हाडांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र गुडघ्याचे लिगामेंट्स आणि पाठीला दुखापत झालेली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ऋषभ पंत शुद्धीवर होता, असे नागर यांनी सांगितले. ऋषभ पंतवर सध्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>> अपघातानंतर ऋषभ पंतची काय स्थिती होती? त्याला कारमधून कसे बाहेर काढले? मदत करणाऱ्या बसचालकाने सांगितला घटनाक्रम
नेमका कोठे घडला अपघात?
दरम्यान, ऋषभ पंत हा दिल्लीहून उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ १०८ ला फोन करत ऋषभला रुग्णालयात दाखल केले. अपघातावेळी कारमध्ये ऋषभ पंत एकटाच होता.