भारतानं टी २० विश्वचषक आपल्या नावावर केल्यानंतर अवघ्या देशानं दिवाळी साजरी केली. गुरुवारी भारतीय क्रिकेटपटू मायदेशात परतले. आधी दिल्लीत त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली. त्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झाली. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत निघालेल्या विजयी मिरवणुकीत टीम इंडियाचं हजारो मुंबईकरांची स्वागत केलं. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या खेळाडूंचा मोठा सत्कार करण्यात आला. त्याआधी दिल्लीत टीम इंडियाशी मोदींनी साधलेल्या संवादाचा तपशील आता समोर येऊ लागला आहे. यावेळी मोदींनी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अक्षर पटेल यांना कोणते प्रश्न विचारले, याविषयी इंडियन एक्स्प्रेसनं माहिती दिली आहे.
टीम इंडियाची दिल्लीत मोदींनी घेतली भेट!
विश्वविजयी टीम इंडियाचं मोदींनी सोशल मीडियावर अभिनंदन केलंच होतं. पण मायदेशी परततातच सर्वात आधी पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली. यावेळी संघातल्या खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला. यावेळी संघातल्या काही खेळाडूंना मोदींनी काही प्रश्न केले. त्यात कर्णधार रोहित शर्माला त्यांनी एक खास प्रश्न विचारला. अंतिम सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मानं मैदानावरची चिमुटभर माती चाखली होती. या प्रसंगाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यासंदर्भात मोदींनी रोहित शर्माला यावेळी प्रश्न विचारला.
“त्या दिवशी मैदानावरची माती तू चाखलीस. त्या मातीची चव कशी होती रोहित?” असा प्रश्न या भेटीत मोदींनी रोहित शर्माला विचारला. या प्रश्नावर रोहित शर्मानं फक्त अर्थपूर्ण स्मितहास्य करून उत्तर दिलं. यावेळी वातावरण भावनिक झाल्याचं दिसून आलं.
रोहितनं का चाखली होती माती?
दरम्यान, आपण असं का केलं होतं? याचं उत्तर रोहित शर्मानं सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना दिलं होतं. “त्या अनुभवाबाबत मी शब्दांत काही सांगू शकणार नाही. कारण त्यातलं काहीही ठरवून केलेलं नव्हतं. विश्वविजयानंतर आमच्या भावना दाटून आल्या होत्या. तेव्हा माझ्या मनात जे काही आलं, ते मी केलं. मी खेळपट्टीजवळ नतमस्तक झालो. कारण त्याच खेळपट्टीवर आम्ही सामना जिंकलो होतो. विश्वचषक जिंकलो होतो. ते मैदान आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. ते क्षण खूप खूप जास्त खास होते.त्या मैदानावर, खेळपट्टीवर आम्ही आमचं मोठं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्या मातीच चव घेण्यामागे हीच भावना होती”, असं रोहित शर्मानं सांगितलं होतं.
Video: विजयी मिरवणुकीदरम्यान ‘ते’ दृश्य पाहून भारतीय क्रिकेटपटूंना बसला धक्का; विराटन रोहितला सांगितलं आणि…
नरेंद्र मोदी विराट कोहलीला म्हणाले…
दरम्यान, रोहित शर्माप्रमाणेच नरेंद्र मोदींनी विराट कोहली आणि अक्षर पटेललाही असेच प्रश्न केले. “अंतिम सामन्यापूर्वी तुझ्याकडून फार कमी धावा झाल्या होत्या. अशा स्थितीत अंतिम सामन्याला सामोरा जाताना तुझ्या मनात काय चाललं होतं?” असा प्रश्न मोदींनी विराट कोहलीला केला. अक्षर पटेलला अंतिम सामन्यात फलंदाजीच्या क्रमात बढती देण्यात आली होती. त्यासंदर्भात मोदींनी अक्षर पटेललाही विचारणा केली.
पंतप्रधान मोदी आणि भारतीय खेळाडूंच्या संवादासंदर्भातील काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.