PM Modi On IND vs PAK Match : अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध विषयांवर भाष्य करत तब्बल तीन तास संवाद साधला. या संवादात मोदींनी देशातील विविध विषयांवर भाष्य केलं. एवढंच नाही तर भारत-चीन, भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष, तसेच गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावरही पंतप्रधान मोदींनी भूमिका मांडली. यावेळी मोदींना भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मोदींनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट संघात कोणता संघ अधिक सरस आहे? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला होता. यावर बोलताना मोदी म्हणाले की, “खेळ संपूर्ण जगाला ऊर्जा देण्याचं काम करतो, खेळाची भावना जगाला जोडण्याचं काम करते. त्यामुळे मला खेळांना बदनाम होताना बघायला आवडणार नाही. मी खेळाला मानवी विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा भाग मानतो”, असं मोदींनी म्हटलं.

“आता कोण चांगलं आणि कोण वाईट यावर बोलायचं झालं तर मी यातला तज्ञ नाही. त्यामुळे मी याबाबत तांत्रिकरित्या काही सांगू शकत नाही. मात्र, यामधील जे तज्ञ आहेत ते याबाबत सांगू शकतील. पण भारत-पाकिस्तान सामना काही दिवसांपूर्वीच झाला आणि निकालांवरून हे स्पष्ट झालं की कोणता संघ चांगला आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा पराभव झाला होता

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे अनेक वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. तेव्हापासून टीम इंडिया आणि पाकिस्तानी संघ आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धेत भिडत आहेत. गेल्या महिन्यातच दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गत २३ फेब्रुवारी रोजी दुबईत सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला होता.