PM Modi speaks to Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकत सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचा विक्रम केला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी फोनवरून संवाद साधत या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. तब्बल चार मिनिटे मोदींनी नीरजीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आता सुवर्णपदक विसरून जा, असे सांगत त्याची समजूत घातली. नीरज चोप्राने त्याच्या दुखापतीबद्दल मोदींना माहिती दिली. दुखापत झाल्यामुळे भाला फेकताना जी ऊर्जा लावावी लागते, ती लावता आली नाही, असेही नीरजने सांगितले. यावर मोदींनी त्याची समजूत घालत आपण जेव्हा भेटू तेव्हा दुखापतीवर चर्चा करू, असे आश्वासन दिले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबीयांचेही कौतुक केले. विशेष करून नीरजच्या आईने मुलाला रौप्यपदक मिळाल्यानंतर सुवर्णपदक जिंकलेल्या पाकिस्तानी खेळाडूही माझ्या मुलाप्रमाणे असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी याबाबत त्याच्या आईची स्तुती केली.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“रौप्यपदक जिंकल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. तू संपूर्ण देशाला पुन्हा एकदा गौरव प्राप्त करून दिलास. मी रात्री तुझा खेळ पाहत होतो. संबंध देश तुझ्याकडे नजरा लावून होता. कोट्यवधी लोकांना तुझ्याकडून आशा होत्या”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर नीरज चोप्रा उत्तर देताना म्हणाला की, मला दुखापतीने त्रस्त केले. नाहीतर मी सुवर्ण नक्कीच जिंकले असते. दुखापतीमुळे भाला फेकताना मला जास्त ताकद लावता आली नाही. त्यावर पंतप्रधान मोदी लगेच म्हणाले की, “तुझ्या दुखापतीचे काय करायचे?” यावर नीरजही हसत हसत म्हणाला की, आता संघ आणि प्रशिक्षक एकत्र बसून त्यावर निकाल घेऊ.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, यावेळीही तू चांगला खेळ दाखविलास. तसेच मागच्या वेळेसही तू प्रतिस्पर्धी खेळाडूची प्रशंसा केली होतीस. त्यानंतर कालही तू म्हणालास की, प्रतिस्पर्ध्यांकडून कडवी टक्कर मिळणार आहे. दुखापतग्रस्त असूनही तू रौप्यपदक मिळवले, हे पाहून आपल्या युवा पिढीलाही आश्चर्य वाटेल.
हे वाचा >> सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…
नीरज चोप्राच्या आईचेही केले कौतुक
नीरज चोप्राची आई सरोज देवी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना सुवर्णपदक जिंकलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूचेही कौतुक केले होते. या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदी नीरजला म्हणाले की, तुझी आईही खेळाडू होती का? मी तिची मुलाखत सकाळी पाहिली. त्यामध्ये एका खेळाडूप्रमाणे त्यांनी खिलाडू वृत्ती दाखवली. त्यांनी सुवर्णपदक विजेत्या खेळडूलाही स्वतःचा मुलगा असल्याचे संबोधले. हे स्पिरिट खेळाडूच्या घरातच पाहायला मिळू शकते.
आता मनातून सुवर्णपदकाचा विचार काढ…
दुखापतीमुळे सुवर्णपदक हुकल्याची खंत वारंवार बोलून दाखविल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राची समजूत काढली. “दुखापत होऊनही तू चांगला खेळ सादर करून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहेस. त्यामुळे मनातून आता सुवर्णपदकाचा विचार काढून टाक. तू स्वतःच सुवर्णपदक आहेस. दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खूप कमी खेळाडू आहेत. त्यात तुझा आता समावेश झाला आहे. आता जेव्हा आपण भेटू तेव्हा तुझ्या दुखापतीवर चर्चा करू”, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.