Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूप्रमाणेच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न भंग झालं. भारतानं दिलेलं २४० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं आणि सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. पराभवानंतर प्रत्येक भारतीय खेळाडूच्या चेहऱ्यावर त्या स्वप्नभंगाची किनार दिसत होतं. मोहम्मद सिराजसह खुद्द कर्णधार रोहित शर्मालाही अश्रू अनावर झाले. या पराभवामुळे भारतीय संघावर निराशा पसरलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
काय आहे मोदींची पोस्ट?
अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असला, तरी विश्वचषकात संघानं केलेल्या कामगिरीमुळे भारतीयांनी आपल्या खेळाडूंच्या या प्रवासावर समाधान व्यक्त केलं आहे. काहीशा त्याच प्रकारच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी एक्सवर (ट्विटर) ही पोस्ट केली आहे.
Ind vs Aus Final: रोहित शर्मानं सांगितलं अंतिम सामन्यातील पराभवाचं कारण; म्हणाला, “कदाचित…!”
“प्रिय टीम इंडिया…तुम्ही संपूर्ण विश्वचषकात केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. तुम्ही तुमच्या खेळात सर्वोत्तम स्पिरीट दाखवलंत. तुम्ही देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. आज आणि कायम”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय झालं सामन्यात?
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्मानंही आपण फलंदाजीच करणार होतो, अशी प्रतिक्रिया दिली. या सामन्यातही रोहित शर्मानं गेल्या १० सामन्यांप्रमाणेच तडाखेबाज सुरुवात करून दिली. मात्र, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली व के एल राहुल वगळता इतर भारतीय फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. परिणामी भारतीय संघ २४० धावांवर सर्वबाद झाला.
विश्वचषक विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या पॉवर प्लेमध्येच ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. पण नंतर मैदानावर आलेल्या ट्रेविस हेडनं मार्नस लाबुशेनला जोडीला घेत १९२ धावांची दमदार भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलं. तो बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाच्या विजयाची ऑपचारिकता पूर्ण केली.