कोलकाता नाईट रायडर्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात धडाक्यात झाली खरी. सनरायजर्स हैदराबादवर कोलकातानं पहिल्याच सामन्यात १० धावांनी विजय मिळवला होता. पण त्यानंतर मात्र कोलकाताला गेल्या ४ सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे कोलकाताचा कर्णधार अयॉन मॉर्गन चांगलाच चिंतेत सापडला असून शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मॉर्गननं ही चिंता बोलून देखील दाखवली. “आमच्याकडे पार्टनरशिप करणारे फलंदाज आहेत. पण आमच्यात जिंकण्याची इच्छा आणि प्रेरणाच कमी पडली”, असं मॉर्गन म्हणाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थाननं कोलकाताला ६ विकेट्सनं हरवत गुणतालिकेत वरच्या स्थानावर झेप घेतली. तर यंदाच्या आयपीएलमधल्या सलग चौथ्या पराभवानंतर कोलकाता एका विजयासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत.
फलंदाजी हीच समस्या!
सामन्यानंतर बोलताना मॉर्गननं कोलकाताची खरी समस्या फलंदाजीची असल्याचं मान्य केलं. “मला वाटकं आमच्यात जिंकण्याची इच्छा आणि प्रेरणाच कमी पडली. राजस्थान रॉयल्सला खेळपट्टीशी फार लवकर जुळवून घेता आलं, पण आम्ही त्यात कमी पडलो. त्यामुळे मी म्हणेन सर्वात मोठी समस्या ही फलंदाजीची आहे. आम्हाला आजच्या सामन्यात किमान ४० धावा कमी पडल्या. टी-२० सामन्यामध्ये ४० धावा फार असतात. गोलंदाजांसाठी तर खूपच जास्त!”, असं मॉर्गन म्हणाला.
RR vs KKR : राजस्थानचा कोलकातावर ‘हल्लाबोल’!
शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताचे फलंदाज वानखेडेवर फटकेबाजी करतील असा अंदाज होता. पण ख्रिस मॉरिसच्या भेदक गोलंदाजीसमोर कोलकाराच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कोलकाताला २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. उत्तरादाखल राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसननं केलेल्या संयमी ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थाननं कोलकाताचा ६ विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
IPL 2021 : राजस्थानचा रियान पराग पुन्हा एकदा ‘हटके’ सेलिब्रेशनमुळे चर्चेत!
आक्रमक झालो आणि विकेट गमावली!
दरम्यान, फलंदाजीविषयी मॉर्गननं विशेष नाराजी व्यक्त केली. “प्रत्येक वेळी आम्ही आक्रमक व्हायचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली. हे फार निराशाजनक होतं. त्यावर आम्हाला बरंच काम करावं लागणार आहे. आमच्या संघाच्या क्षमता ही समस्या नसून आम्हाला स्मार्ट आणि फ्री-फ्लोईंग क्रिकेट खेळण्याची गरज आहे”, असं मॉर्गन म्हणला.