भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक करण्यात आली. न्यूज १८ हरियाणा आणि पंजाब केसरीच्या वृत्तानुसार, हरियाणाच्या हांसी येथील हिसार पोलिसांनी युवराजला अटक केली. अनुसूचित जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटमध्ये यजुर्वेंद्र चहलवर अनुसूचित जातीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप युवराजवर आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर युवराज चंदीगडला पोहोचला. तिथे त्याला हिसार पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.

अटकेनंतर सुटका

अटकेनंतर हिसार जिओ मेसमध्ये युवराजची चौकशी करण्यात आली. यानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने युवराजला अटकपूर्व जामिनाचे आदेश दिले होते. यामुळे, हांसी पोलिसांनी त्याला औपचारिकरित्या अटक केली, त्याच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आणि नंतर त्याला अटकपूर्व जामीन पत्रांच्या आधारे सोडण्यात आले.

हेही वाचा – टीम इंडियामध्ये पाच पदांसाठी भरती..! BCCIने मागवले अर्ज

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर युवराज हिसारला पोहोचला. त्याच्यासोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह चार-पाच कर्मचारी आणि वकीलही चंदीगडहून हिसारला पोहोचले होते. काही तासांच्या कारवाई आणि चौकशीनंतर ते पुन्हा एकदा चंदीगडला रवाना झाले. सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, ज्यावर युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोशल मीडियावर मागितली होती माफी

या प्रकरणी युवराजने जगासमोर आपली चूक मान्य केली. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याने माफी मागितली होती, युवीने लिहिले, ‘मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी कधीही जाती, रंग, वर्ण आणि लिंगाबाबत कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास ठेवला नाही. मी लोकांच्या भल्यासाठी माझे आयुष्य दिले आहे आणि ते आजही चालू आहे. मी माझ्या मित्राशी बोलत होतो, माझा मुद्दा चुकीचा समजला गेला, जो निराधार आहे. तथापि, एक जबाबदार भारतीय असल्याने, मी हे सांगू इच्छितो की जर मी अजाणतेपणे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याबद्दल खेद वाटतो. माझे भारत आणि तेथील लोकांसाठी प्रेम नेहमीच राहील”, असे भारतासाठी ३०४ वनडे, ५८ टी-२० आणि ४० कसोटी सामने खेळणाऱ्या युवराजने म्हटले होते.

नक्की प्रकरण काय?

युवराजवर अनुसूचित जाती समाजाविरुद्ध अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप होता. दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी त्यांच्याविरोधात हांसी पोलीस स्टेशन शहरात एससी-एसटी कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली आरोप केला होता. युवराजने हा खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ज्यावर उच्च न्यायालयाने युवराजविरुद्ध पोलिसांच्या कारवाईला स्थगिती दिली होती.

Story img Loader