क्रीडा संघटनांमधील राजकारण्यांच्या सहभागाबाबत नेहमीच टीका केली जाते. मात्र त्यांनी खेळाशी संबंधित संघटनांमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे, असे उद्गार अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने काढले. खेळाडू विविध कारणांसाठी सरकारवर अवलंबून असतात. सरकारच्या कामकाजाची पद्धत राजकारणी उत्तम पद्धतीने जाणतात. त्यामुळे त्यांनी संघटनांमध्ये राहणे गरजेचे आहे. खेळाडूंनी कारकीर्द संपल्यानंतर संघटनेचे काम करावे, परंतु संघटनेत आल्यावर त्यांनी राजकारणी होऊ नये, असा टोलाही ज्वालाने लगावला. मी खेळायचे थांबवल्यानंतर संघटनेने निमंत्रित केल्यास संघटनेचे काम करायला आवडेल, असेही ती म्हणाली.
थॉमस-उबेर बॅडमिंटन चषक स्पर्धेच्या निमित्ताने ज्वालाने पुन्हा एकदा आपली परखड मते मांडली. उबेर चषकात भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवून देण्यात अनुभवी ज्वालाची भूमिका निर्णायक ठरली. ‘‘पहिल्यांदाच आयोजनाचा मान मिळालेल्या भारताने थॉमस-उबेर चषकात जबरदस्त कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले सामथ्र्य सिद्ध केले आहे,’’ असे ज्वालाने आवर्जून सांगितले.
गेल्या वर्षी इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये क्रिश दिल्ली स्मॅशर्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या ज्वालावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. याविषयी ती म्हणाली, ‘‘बंदीचा निर्णय ऐकून मला धक्काच बसला आणि अतिशय वाईट वाटले. माझा खेळायचा मार्गच बंद करण्यात आला होता. मी कुठलीही चुकीची गोष्ट केली नव्हती, कोणालाही फसवले नव्हते. खेळभावनेला बट्टा लागेल, असे कृत्यही केले नव्हते. तरी मला एवढी गंभीर शिक्षा सुनावली गेली. मला खेळायचे होते. देशाप्रती जिंकणे हेच माझे उद्दिष्ट आहे, हे सिद्ध करण्यासाठी मला न्यायालयीन मार्ग पत्करावा लागला. माझी बाजू खरी असल्याने निकाल माझ्या बाजूने लागला. त्यानंतरची माझी कामगिरी पुरेशी बोलकी आहे. प्रत्येक वेळी वादामध्ये मला अडकवले जाते. वाईट मनोवृत्तींविरुद्ध लढण्याचा आता कंटाळा आला आहे,’’ असे ज्वालाने सांगितले.
‘‘भारतात दुहेरी खेळण्यासाठी पोषक वातावरण नाही. मी आणि अश्विनीने जागतिक तसेच आशियाई स्तरावर देशासाठी पदक जिंकले आहे. मात्र तरीही कोणत्याही पुरस्कारासाठी आमची शिफारस झालेली नाही,’’ अशी खंतही ज्वालाने बोलून दाखवली.

Story img Loader