आतापर्यंत क्रीडा क्षेत्रातील राजकारणापासून दूर असल्याचा समज झालेल्या शहरातील बुद्धिबळात जाणीवपूर्वक ‘तिरक्या’ चाली रचण्यात येऊ लागल्याचे दिसून येत असून त्याची झळ येथे एका अकादमीतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन स्पर्धेला बसली आहे. या स्पर्धेत स्थानिकांचा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळण्यास या तिरक्या चाली कारणीभूत ठरल्याचा आक्षेप घेत आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक येथील मोरफी चेस अकादमीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या या स्पध्रेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयसह सर्व स्तरातील १९६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेवर दक्षिण भारतीय बुद्धिबळपटूंचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. तेलंगणचा आर. चक्रवर्ती रेड्डी नऊ पैकी ७.५ गुणांसह विजेता ठरला. त्याला ६१ हजाराचे बक्षिस देवून गौरवण्यात आले. दुसरा क्रमांक तामीळनाडूचा व्हीव्हीएव्ही राजेश व तिसरा क्रमांक आंध्रा बँकेचा विनयकुमार मत्ता यांनी मिळवला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ ग्रँडमास्टर विदित गुजराथीचे आई-वडील डॉक्टर संतोष गुजराथी, डॉ. निकीता गुजराथी, सुधीर पगार, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले, विनोद भागवत यांच्या उपस्थितीत पार पडला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत कोणत्याही खेळाडूला सर्व डाव जिंकता आले नाहीत. इंडियन एयरलाइन्सची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी व महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अनुपमा गोखले यांना अनुक्रमे १३ व १५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीन लाख रुपयांची बक्षिसे खेळाडूंना देण्यात आली. नाशिकचे खेळाडू व पालकांना बुद्धिबळाचे तंत्र शिकता येईल, अनुभव घेता येईल, त्यातून भविष्यात ग्रँडमास्टर विदितसारखे खेळाडू नाशिकमधून तयार व्हावेत, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

‘‘अशा स्पर्धा बाहेर जावून खेळण्यासाठी कमीतकमी १५ ते २० हजार रूपयांचा खर्च खेळाडूला करावा लागतो. परंतु आपल्याच शहरात अत्यंत कमी दरात अशी संधी उपलब्ध झाली असतानाही स्थानिक खेळाडूंचा अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली आहे. शहरात सुमारे २० प्रशिक्षकांकडे १५० ते २०० खेळाडू प्रशिक्षण घेत असल्याने या स्पर्धेत स्थानिकांची संख्या किमान शंभरपेक्षा अधिक असणे अपेक्षित असताना केवळ ४० ते ५० पर्यंत ती मर्यादित राहिली. त्यास शहरातील काही प्रशिक्षकांचे आडमुठे धोरण कारणीभूत राहिले,’’ असे अकादमीच्या वतीने विनोद भागवत यांनी नमूद केले.

‘‘आपले विद्यार्थी या स्पर्धेत बक्षिसाच्या यादीत न लागल्यास आपल्या वरवर दिसणाऱ्या पोकळ ज्ञानाचे वाभाडे निघेल या भीतीने त्यांनी खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यास प्रोत्साहन दिले नाही. त्यामुळे त्या होतकरू मुलांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक जिल्हा पातळीच्या स्पर्धा खेळून खेळाडूला प्रोत्साहन मिळते. परंतु, चांगला खेळ समजण्यासाठी मोठय़ा स्पर्धेतील सहभाग अतिशय महत्वाचा असतो. आपल्यापेक्षा अनुभवाने अधिक खेळाडूबरोबर खेळल्यास आपल्या खेळात सुधारणा होणे सहजशक्य आहे. आपल्याप्रमाणेच सम गुणवत्ता असलेल्या दुसऱ्या खेळाडूबरोबर खेळून खेळाचा दर्जा उंचावता येत नाही. स्पर्धेतील सहभागासाठी स्थानिक खेळाडूंना प्रशिक्षण मोफत ठेवण्यात आले होते,’’ असे भागवत यांनी स्पष्ट केले.

‘‘शहरातील इतर प्रशिक्षकांनी त्यांच्या खेळाडूंना स्पर्धेत सहभाग घेण्यास प्रोत्साहन दिले असते तर स्थानिक खेळाडूंची स्पर्धेतील संख्या वाढून त्यांना इतर खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा झाला असता. नाशिकचे डॉ. राजेंद्र सोनवणे, हर्षद वळदे, विजय सूर्यवंशी, तन्मय महाले, विवेक वाटपाडे, मंगेश कोटा, सिद्धान्त सोनार, स्वप्नील गोरे, आदित्य आव्हाड, प्रवीण मांडले, दुर्गेश पाटील, आदित्य राठी यांनी सुमारे तीन हजार रुपये रोख रकमेची बक्षिसे जिंकून आयोजकांचा विश्वास सार्थ केला,’’ असे त्यांनी सांगितले.

 

Story img Loader