‘महाराष्ट्र केसरी’ किताब हा राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो, त्यामुळेच या किताबाकरिता होणाऱ्या राज्य कुस्ती अधिवेशनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नेत्यांच्या ढवळाढवळीमुळे ही स्पर्धा म्हणजे राजकीय आखाडाच बनली आहे.
कुस्ती खेळाला उद्योगसंस्था व शासनाचे फारसे सहकार्य नसतानाही राजाश्रय मिळत असे. आता राजेरजवाडे संपले आणि संस्थानेही खालसा झाल्यानंतर या खेळांना कुणी वालीच उरला नव्हता. शासनाची मदत घेण्याखेरीज कुस्तीला अन्य कोणताच पर्याय नव्हता. शासनाची मदत हवी असेल तर राजकीय नेत्यांची मदत घेणेही अपरिहार्य होऊ लागले. कुस्तीची लोकप्रियता अजूनही टिकली आहे. महाराष्ट्र केसरी किताबाकरिता जवळजवळ एक लाख प्रेक्षक आवर्जून उपस्थित असतात. साहजिकच आपली राजकीय स्वप्ने साकार करण्यासाठी कुस्ती स्पर्धा हा योग्य मार्ग आहे, असे राजकीय नेत्यांना वाटले तर त्यात नवल नाही. एखादा राजकीय नेता आपणहून जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यासाठी तयारी दाखवत आहे, असे पाहिल्यानंतर कुस्ती संघटकांची बरीचशी डोकेदुखी कमी होते. अकलूज, कडेगाव आणि अलीकडे भोसरी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकीय नेत्यांची विनाकारण ढवळाढवळ पाहायला मिळाली.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून कुस्ती हद्दपार होण्याची वेळ आली होती. कुस्तीच्या संयोजनात व्यावसायिकतेचा अभाव व राजकीय हस्तक्षेपाचा अतिरेक आदी कारणे त्यासाठी देण्यात आली होती. सुदैवाने कुस्तीचे स्थान टिकले. मात्र ठेच लागली तरी शहाणे होत नाही, असाच अनुभव कुस्ती संघटकांबाबत दिसून येत आहे. केसरी किताबाच्या स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ते परराज्यांमधूनही हौसेने प्रेक्षक येत असतात. कुस्ती पाहायला आलेले प्रेक्षक सहसा भाषणबाजी सहन करत नाहीत. त्यांना कुस्तीच्या रंगतदार लढती पाहण्याची इच्छा असते. यापूर्वी अनेक वेळा भाषणबाजीला कंटाळून प्रेक्षकांनी स्पर्धेत गोंधळ घातल्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. प्रेक्षकांची गॅलरी मोडणे, व्यासपीठाच्या दिशेने मातीची ढेकळे फेकणे, दगडफेक करणे असे अनेक प्रकारही घडले आहेत. भोसरी येथेही भाषणबाजी झाली. सुदैवाने प्रेक्षकांनी संयमाने सर्व काही निमूटपणे सहन केले.
भोसरीतील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकीय गटबाजीचा प्रत्यय प्रकर्षांने दिसून आला. ही स्पर्धा कुस्ती परिषदेचे सदस्य असलेले तेथील नगरसेवक महेश लांडगे यांनी आयोजित केली होती. त्यांना आमदारपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळेच या स्पर्धेपूर्वी वरिष्ठ गटाची जिल्हा कबड्डी स्पर्धा त्यांनी अतिशय भव्य स्वरूपात आयोजित केली. पारितोषिकांची रेलचेल त्या वेळी पाहावयास मिळाली. त्याच मैदानात लगेचच त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली. लांडगे हे त्या परिसरातील आमदारांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांच्याविरुद्ध शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कुस्ती स्पर्धा ही हुकमी संधी त्यांनी मानली. उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, तर समारोपासाठी राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांना पाचारण करत त्यांनी आपण किती ताकदवान आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे दोन्ही मंत्री राजकारणात अतिशय मुरलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या भाषणात लांडगे यांच्या चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. राजकीय नेत्यांना उद्घाटन किंवा समारोपासाठी पाचारण करताना आपण खेळाडूंचा व प्रेक्षकांचा किती वेळ वाया घालविला हे मात्र या संघटकांनी लक्षात घेतले नाही. कुस्तीच्या लढतींमध्ये प्रमुख पाहुण्यांपेक्षाही सहभागी खेळाडू अधिक महत्त्वाचा असतो, हे संयोजक लक्षातच घेत नाही. अंतिम दिवशी राजकीय नेत्यांच्या सत्कार समारंभांवर वेळ घालवताना मैदानात मल्ल लढतीसाठी तयार आहे, याचा संयोजकांना पूर्णपणे विसर पडला असावा. असे अनेक वेळा तेथे घडले.
कुस्ती खेळाला पैसा कमी पडतो, असे कुस्तीचे संघटक प्रत्येक स्पर्धेत बोलून दाखवितात. आपली विनंती ऐकून राजकीय नेते किंवा मंत्री महोदय लगेचच काही घोषणा करतील अशी त्यांची अपेक्षा असते. वास्तविक केसरी स्पर्धेच्या वेळी पैशाची किती उधळपट्टी झाली हे चाणाक्ष प्रेक्षकांनाही लगेच लक्षात आले. अंतिम लढतीच्या वेळी संपूर्ण मैदानावर व प्रेक्षकांवर हेलिकॉप्टरमधून अनेक वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. संयोजकांनी किंवा त्याच्या प्रायोजकांनी हेलिकॉप्टरसाठी भरघोस खर्च केला. तो खर्च टाळून त्यामध्ये भोसरी येथील तीन-चार खेळाडूंच्या खुराकासाठी पैसा उपलब्ध झाला असता. तशीही ही फुले किंवा पाकळ्या प्रेक्षकांच्या पायदळीच गेल्या याचे भान कोणालाही नव्हते.
कुस्ती स्पर्धा आणि फेटे बांधणे याचे अतूट नाते आहे. या स्पर्धेच्या अंतिम दिवशी एक हजारहून अधिक नामवंत मल्ल व व्यक्तींना फेटे बांधण्यात आले. समजा एका फेटय़ाची किंमत शंभर रुपये गृहीत धरल्यास संयोजकांनी एक लाख रुपये केवळ फेटय़ांवर उधळले. याच पैशात तीन-चार होतकरू व गरजू मल्लांच्या एक वर्षांच्या आहाराकरिता आर्थिक तरतूद झाली असती. तसेच ज्या नामवंत पहिलवानांचा गौरव करण्यात आला, त्यापैकी किती मल्लांनी खरोखरीच आतापर्यंत किती ऑलिम्पिक मल्ल घडविले आहेत याचा हिशोब कुस्ती संघटकांनी कधी केलाही नसेल. कारण बहुतांश मल्ल हे केवळ मैदानात सत्कार समारंभ स्वीकारण्यासाठीच येतात असा अनुभव आहे.
विविध प्रकल्पांकरिता मंत्र्यांकडे लाचार होऊन आर्थिक निधीची मागणी केली जाते. मात्र कुस्तीचे किती प्रकल्प सुरू आहेत आणि अस्तित्वात असलेल्या कुस्ती स्टेडियमची दुरवस्था कोणाच्या चुकांमुळे झाली आहे, याचा विचार प्राधान्याने करण्याची आवश्यकता आहे. पुण्यातील शिवाजी स्टेडियम व कात्रज येथील कुस्ती संकुल ही त्याची बोलकी उदारहणे आहेत. लोकांपुढे हात पसरण्यापूर्वी स्पर्धामध्ये होणारा अनाठायी खर्च कसा टाळता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. संयोजनात व्यावसायिकता आणि पारदर्शकता आणली तर कुस्ती संघटक हजारो रुपये वाचवू शकतील.

Story img Loader