प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कासाठी शिफारस न झाल्यामुळे नाराज झालेली थाळीफेकपटू कृष्णा पूनिया हिने बुधवारी क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी खेलरत्न पुरस्काराबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी तिला दिले.
क्रीडामंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिवसभर क्रीडा मंत्रालयात वाट पाहणाऱ्या कृष्णाने आपला पती विरेंद्र पूनियासोबत क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. १५ मिनिटे रंगलेल्या चर्चेनंतर कृष्णा म्हणाली, ‘‘क्रीडामंत्र्यांनी मला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली यादी मागवल्यानतर निवड प्रक्रियेत काही चुका झाल्या आहेत का, हे तपासण्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले आहे. जर चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्यात येतील, असेही क्रीडामंत्र्यांनी यावेळी सांगितले. मला योग्य न्याय मिळेल, अशी आशा आहे.’’
ट्रॅप नेमबाज रंजन सिंग सोधी याच्यासोबत विभागून हा पुरस्कार देण्याची मागणी कृष्णाने केली असता क्रीडामंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन तिला दिले.
सोधीची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आल्यानंतर निवड समितीतील काही सदस्यांनी निवड प्रक्रियेवर शंका व्यक्त करत या वादाला तोंड फोडले होते. अनेक सदस्यांनी खेलरत्नसाठी शिफारस केली, त्यामध्ये सोधीचे नाव नव्हते. पण नंतर त्याच्या नावाचा विचार करण्यात आल्याचे समजते. कृष्णा आणि लंडन पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या एच. एन. गिरिषा यांची निवड समितीतील १२ पैकी ११ सदस्यांनी शिफारस केली होती. त्यावेळी सोधीच्या नावाचा उल्लेखही नव्हता. ‘‘असे असले तरी सोधीसोबत हा पुरस्कार विभागून घ्यायला मी तयार आहे. सोधीची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आले, याबाबत मला काहीही घेणेदेणे नाही. पण माझ्या नावाचाही विचार व्हायला हवा,’’ असेही तिने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा