‘‘पूर्वी फक्त मुंबईमध्येच क्रिकेट खेळले जायचे, त्यामुळे मुंबईचे जास्त खेळाडू भारताच्या संघात दिसायचे. त्या वेळी रणजीमध्येही मुंबईचे वर्चस्व होते. आता क्रिकेट भारतात सर्वत्र पसरले. क्रिकेटचा चांगला प्रसार झाला. त्यामुळे स्पर्धा वाढली आणि मुंबईची पूर्वीसारखी भक्कम स्थिती राहिली नाही,’’ असे काही माजी क्रिकेटपटू म्हणतात. पण एक गोष्ट कळत नाही. क्रिकेटचा प्रसार झाला. स्पर्धा वाढली. खेळाडू व्यावसायिक झाले. अन्य राज्यांतील खेळाडूंची गुणवत्ता बहरली, मग ज्या मुंबईत शाळांपासून ते क्लबपर्यंत क्रिकेट खेळले जाते, त्या मुंबईला ११ ‘खडूस’ खेळाडू का सापडत नाहीत? अन्य राज्यांतील खेळाडूंची गुणवत्ता बहरली, मग मुंबईतली गुणवत्ता कमी झाली का? की मुंबईच्या खेळाडूंना स्पर्धात्मक क्रिकेट खेळणे जमत नाही? मुंबईला रणजी क्रिकेट स्पर्धेमधील वरचष्मा का राखता आला नाही, हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. मुंबईच्या संघात सध्या काय चालले आहे? रोहित शर्मा, अिजक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णीसारखे भारताकडून खेळलेले क्रिकेटपटू तुमच्या ताफ्यात आहेत, मग तुमची एवढी ससेहोलपट का व्हावी, याचे उत्तर कुणाकडे नाही.
यंदाच्या दोन रणजी सामन्यांत मुंबईची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पहिला बडोद्याचा आणि दुसरा कर्नाटकचा सामना. बडोद्याच्या संघात कोणता नावाजलेला खेळाडू होता? सामना तर वानखेडे स्टेडियमवर होता. मग तीन दिवस बडोद्याच्या खेळाडूंनी मुंबईच्या वाघाची मांजर का केली? बडोद्याचा संघ चांगलाच खेळला. त्यांच्यामध्ये बळ भरले ते मुंबईच्याच माजी क्रिकेटपटूंनी. सामन्यापूर्वी वाजत-गाजत वांद्रे-कुर्ला येथील संकुलामध्ये सोहळा केला. ‘खडूस’ या शब्दाने मुंबईच्या खेळाडूंना अपचन झाले असावे, एवढा या शब्दाचा मारा झाला. मुंबईचे खेळाडू त्या गतअनुभवात रमले. पण तेव्हाचे क्रिकेट, क्रिकेटपटू आणि आपण यांच्यातील फरक त्यांच्या गावी नव्हता. दुसरीकडे मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंनी बडोद्याचे प्रशिक्षक अतुल बेदाडे आणि खेळाडूंना ‘तुमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. बिनधास्त खेळा आणि जिंका’ अशी यशाची गुरुकिल्ली दिली. ही गोष्ट बडोद्याच्या संघाने फक्त ऐकली नाही तर प्रत्यक्षातही आणली. पहिले तीन दिवस त्यांनी मुंबईच्या संघाला डोके वर करू दिले नाही. अतित सेठ आणि लुकमन मेरिवाला हे काही अॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉक नव्हते. पण पहिल्या डावात त्यांच्यापुढे मुंबईचे फलंदाज गारठले. सोहळ्यातील ‘खडूस’पणाची नशा कदाचित उतरली नव्हती त्यांची. अजिंक्य रहाणेसारखा फलंदाज भोपळा न फोडता माघारी परतला होता. स्वप्निल सिंग आणि आदित्य वाघमोडे यांनी मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. सामन्याच्या अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यात अजिंक्यला अपयश आले. पण सिद्धेश लाड तारणहार ठरला आणि त्याने मुंबईची इभ्रत राखली. या सामन्यात भारतीय संघातून परतलेल्या श्रेयस अय्यरच्या देहबोलीत खडूसपणा होता, तो त्याने फलंदाजीत दाखवायला हवा होता. सामना वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रेयसने रिव्हर्स स्विप मारावा, हे मुंबईच्या क्रिकेटचे दुर्दैव नाही का? धवल आणि शार्दुल या दोघांनी १६९ धावा दिल्या, बळी मिळवले पाच. पहिल्या डावात १७१ धावा झाल्यावर या दोघांनी कशी गोलंदाजी करायला हवी होती, हे त्यांना कुणी सांगावे? विजय गोहिल या फिरकीपटूला चेंडू नेमका कुठे टाकायचा, हे समजत नव्हते. त्याने १७७ धावांचा बोनस बडोद्याला दिला. पॅडी शिवलकर यांच्या मुंबईत असा डावखुरा फिरकीपटू पाहायला मिळणे, यासारखे शल्य नाही.
कर्नाटकने तर मुंबईला त्यांची जागा दाखवली. त्रिपुरासारख्या कमकुवत संघाविरुद्ध मर्दुमकी गाजवत मुंबईचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला खरा. पण कर्नाटकविरुद्ध त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. नागपूरच्या जामठय़ाच्या खेळपट्टीवर मुंबईला पहिल्या डावात फक्त १७३ धावा (यामध्ये धवल कुलकर्णीचा ७५ धावांचा वाटा होता, त्याने त्या केल्या नसत्या तर नामुष्कीचा कहर पाहायला मिळाला असता.) करता याव्यात. विनय कुमारच्या अस्त्रांपुढे या ‘खडूस’ फलंदाजांची बॅट मेणाची झाली. कर्नाटकच्या फलंदाजांनी तर मुंबईच्या गोलंदाजीची वाताहत केली. श्रेयस गोपाळने मुंबईच्या संघाच्या जवळपास (१५०) धावा एकटय़ाने केला. शिवम दुबेसारखा पदार्पण करणारा गोलंदाज पाच बळी मिळवतो आणि धवलसारखा अनुभवी गोलंदाज १०५ धावा देतो. यात कुठला खडूसपणा आणि कसले काय?
या हंगामात फक्त दोनच खेळाडूंची कामगिरी चांगली होती. पृथ्वी शॉ आणि सिद्धेश लाड. बाकीच्या खेळाडूंमध्ये व्यावसायिकपणाचा अभाव होता. कमकुवत संघांविरुद्ध फक्त ते चमकले. जय बिश्तासारख्या युवा फलंदाजावर अन्याय का व्हावा? याचे उत्तर नाही. मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने १३५ धावा केल्या होत्या, पण त्यानंतरच्या तामिळनाडूविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो पाणपोई सांभाळत होता. हे सारे अनाकलनीय आणि विचित्र असेच. भारतीय संघातील ये-जा धवलला झेपली नसावी. पूर्वी धवल पहिल्या स्पेलमध्ये संघाला बोहनी करून द्यायचा, तो धवल आता कुठे आहे? धवलच्या पावलावर शार्दुलचे पाऊल पडत असल्याचे दिसते. एका मोसमात सर्वाधिक बळी मिळवल्यानंतर त्याला भारतीय संघाच्या सेवेसाठी बोलावले खरे. पण त्यानंतर मात्र त्याच्यातला वेगवान गोलंदाज दिसला नाही.
सूर्यकुमार यादव हा आयपीएल खेळल्यापासून मोठय़ा अर्विभावात वावरतो. पण या मोसमातल्या त्याच्या धावा किती? नाणे खणखणीत वाजवून माज दाखवणे वेगळे असते. ही प्रवृत्ती दाखवण्यासाठी धावा कराव्या लागतात, हे त्याला कुणी समजावेल का? श्रेयस भारतीय संघात स्थान मिळाल्यापासून रुबाबात फिरतो. पण त्याच्या खात्यावर तेवढय़ा धावाच नाहीत. अजिंक्यसारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाने बडोद्यासारख्या संघापुढे शून्यावर बाद व्हावे? आदित्य तरे कर्णधारपद भूषवतो, पण या पदाला साजेशी कामगिरी तो कधी करणार? अभिषेक नायर आता किती मोसम खेळणार, असे प्रश्न विचारले जात आहेत.
मुळात मुंबईच्या संघात गट-तट आहेत, हे बरेच जण नाकारतील, पण ही वस्तुस्थिती आहे. सिंहासन जिंकण्यासाठी कौरव आणि पांडव एकमेकांविरुद्ध लढले, पण बाहेरच्याने केलेले आक्रमण थोपवण्यासाठी एकत्र यायची त्यांची तयारी होती. तीच गोष्ट या संघात नाही. जोपर्यंत आपापसातले मतभेद विसरून हे खेळाडू प्रतिस्पध्र्याविरुद्ध उभे ठाकले जात नाहीत, तोपर्यंत मुंबई रणजीचे जेतेपद मिळवू शकत नाही.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संघटकांनी मतांच्या राजकारणासाठी अजून किती खेळाडूंना संघात घुसवायचे आहे, हे एकदा ठरवायला हवे. कारण ही गोष्ट ते बंद करणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. प्रशिक्षक समीर दिघे यांच्याकडे रणनीती आहे, पण संघातील भांडणात तिचा बिनबुडाचा विनोदी फार्स झाला आहे. दर्दी मुंबईकरांना या साऱ्याची चिंता आहे, पण ज्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, त्यांच्याकडून तसे होताना दिसत नाही. मुंबईच्या संघाची अशी परिस्थिती यापूर्वीही झाली होती. पण खडूसपणा त्या वेळच्या खेळाडूंच्या रक्तात होता. त्यामुळे सलग तीन सामने गमावल्यावर अमोल मुझुमदार हैदराबादच्या संघनायकाला म्हणाला होता, ‘‘आता आपण अंतिम फेरीत भेटू. आम्ही पोहोचणार आहोत. तुम्ही काय ते तुमचे बघा!’’ त्या मोसमात मुंबईने जेतेपद पटकावले होते, पण हैदराबादचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. अशी धमक या मुंबईच्या संघात कधी येणार?
प्रसाद लाड prasad.lad@expressindia.com