जगज्जेतेपद जिंकण्याची किमया ही फक्त एका खेळाडूच्या कर्तृत्वाच्या बळावर साध्य होऊ शकत नाही, हे वास्तव पोर्तुगालने समजून घेण्याची आवश्यकता आहे. पोर्तुगालच्या संघाची हीच कमजोरी विश्वचषक पात्रता फेरीत अधिक प्रकर्षांने समोर आली. पोर्तुगालचा संघ जगातील कोणत्याही महाशक्तीला धूळ चारू शकतो, परंतु हे सारे काही ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खेळामुळेच शक्य होऊ शकते. त्यामुळेच ‘वन मॅन आर्मी’ असा शिक्का या संघावर बसला आहे.
२०१४ च्या फिफा विश्वचषकात पोर्तुगालची वाटचाल अर्थात अचाट गुणवत्ता असलेल्या रोनाल्डोच्या कामगिरीवरच अवलंबून आहे. पोर्तुगालचा संघ विश्वचषकात पात्र ठरला, तोच मुळी रोनाल्डोच्या आठ गोलमुळे. विश्वचषक पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात ‘फ’ गटात समावेश झालेल्या पोर्तुगालला रशियापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १० सामन्यांपैकी ६ विजय, ३ बरोबरीत आणि एक पराभव अशी पोर्तुगालची कामगिरी होती. त्यानंतर त्यांना ब्राझीलला जाण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणखी एका फेरीचा अडथळा पार करावा लागला. स्वीडनविरुद्ध घरच्या आणि बाहेरच्या दोन्ही मैदानांवर एकंदर ४-२ हुकमत गाजवत पोर्तुगाल विश्वचषकासाठी पात्र ठरला.
१९६६मध्ये पोर्तुगालच्या संघाने विश्वचषकात पदार्पण केले आणि चक्क उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. परंतु वेम्बले स्टेडियमवर इंग्लंडने त्यांचा पराभव करून मग जगज्जेतेपदाकडे वाटचाल केली. त्यानंतर १९८६ आणि २००२मध्ये पोर्तुगाल संघाचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. २००३मध्ये पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने ब्राझीलच्या लुइझ फिलिपे स्कोलारी यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली. तेव्हापासून पोर्तुगालच्या संघाचा कायापालट झाला. युरो-२००४मध्ये हा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. पण दुर्दैवाने ग्रीसकडून हरला. मग २००६च्या विश्वचषकात त्यांनी दुसऱ्यांदा उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. युरो-२००८ नंतर स्कोलारी यांनी पोर्तुगालला अलविदा केला आणि कार्लोस क्वेरोझ यांच्याकडे प्रशिक्षपदाची सूत्रे देण्यात आली.२०१०च्या विश्वचषकात पोर्तुगाल दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला. परंतु जगज्जेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या स्पेनसमोर त्यांचे आव्हान संपुष्टात आले. या खराब कामगिरीमुळे क्वेरोझ यांना आपले प्रशिक्षकपद सोडावे लागले. त्यानंतर पावलो बेंटो यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्तुगालने युरो-२०१२च्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. गेल्या अनेक वर्षांच्या फुटबॉल इतिहासाकडे नजर टाकल्यास फर्नाडो पेरोटो, जोस अॅग्वास, मारियो कॉल्युना, युसेबिओ, हंबेटरे कोएल्हो, पावलो फुट्रे, रिकाडरे काव्र्हालो, लुइस फिगो, व्हिटोरा बाया, पॉलेटा, रिकाडरे क्वारेस्मा, न्युनो गोम्स, रुई कोस्टा, डीको नॅनी, रॉल मेरेलीस आणि रोनाल्डो यांच्यासारखे असामान्य गुणवत्ता असलेले खेळाडू पोर्तुगालमध्ये घडले आहेत. परंतु तरीही कोणतेही महत्त्वाचे जेतेपद त्यांना आजमितीपर्यंत जिंकता आलेले नाही.
फिफा क्रमवारीतील स्थान : ३
विश्वचषकातील कामगिरी
*सहभाग :  ६ वेळा (२०१४सह)
तिसरे स्थान : १९६६
चौथे स्थान : २००६
दुसऱ्या फेरीत : २०१०
संभाव्य संघ
* गोलरक्षक :एडय़ोडरे, रुई पॅट्रिको, बेटो. बचावफळी : पेपे, ब्रुनो अॅल्वीस, फॅबिओ कोन्ट्राओ, जो पीरेरा, रिकाडरे कोस्टा, लुइस नेटो, आंद्रे अल्मेडा. मधली फळी : रॉल मिरेलीस, नानी, जो मॉटिन्हो, मग्युएल व्हेलोसो, सिल्वेस्टर व्हॅरीला, रुबेन अमोरिम, व्हिरिन्हा, विल्यम काव्र्हालो, राफा सिल्व्हा.  आघाडीवीर : ख्रि्रस्तियानो रोनाल्डो (कर्णधार), हिल्डर पोस्टिगा, ह्य़ुगो अल्मेडा, एल्डर.
* स्टार खेळाडू : ख्रि्रस्तियानो रोनाल्डो, हिल्डर पोस्टिगा, पेपे, ब्रुनो अॅल्वीस, नानी, जो मॉटिन्हो.
* व्यूहरचना : ३-३-४-१
*प्रशिक्षक :  पावलो बेंटो.
अपेक्षित कामगिरी
 पोर्तुगालच्या संघात कर्णधार रोनाल्डो, पेस्टिगा, अल्मेडा, एल्डर यांच्यासारखे आघाडीपटू, नानी, जो मॉटिन्होसारखे मध्यरक्षक आणि पेपे, ब्रुनो अॅल्वीस यांच्यासारखे बचावपटू आहेत. या संघाकडून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या माफक अपेक्षा करण्यात येत आहेत. ‘ग’ गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हटल्यास वावगे ठरू नये. जगज्जेतेपदावर दावेदारी करू शकणारे जर्मनी आणि पोर्तुगालसारखे संघ या गटात असले तरी घानाचा संघ आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. परंतु पोर्तुगालचा सध्याचा फॉर्म पाहता या संघाला दुसऱ्या फेरीत आगेकूच करणे मुळीच कठीण नाही.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
 जागतिक स्तरावरील सर्वोत्तम असे आक्रमक फुटबॉल खेळण्याची क्षमता पोर्तुगालमध्ये आहे. आक्रमकता, वेग आणि क्षमता ही पोर्तुगालच्या यशाची त्रिसूत्री आहे. रोनाल्डो हेच पोर्तुगालचे सर्वात महत्त्वाचे बलस्थान आहे. रोनाल्डोला गोल साकारण्यासाठी पास देणे, या सिद्धांतावर संघाचा मोठा भरवसा आहे. पोर्तुगालकडे रोनाल्डो वगळता जागतिक दर्जाचे आघाडीपटू नाहीत, ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यांचा प्रमुख आघाडीवीर हिल्डर पोस्टिगाकडे आक्रमणाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा