लेइपझिग : बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या युवा फ्रान्सिस्को कॉन्सेसाओने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर पोर्तुगालने चेक प्रजासत्ताकवर २-१ असा संघर्षपूर्ण विजय मिळवताना युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली.

पोर्तुगाल संघाला चेक प्रजासत्ताक संघाकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. पोर्तुगालचे प्रशिक्षक रोबर्टो मार्टिनेझ यांनी ९०व्या मिनिटाला कॉन्सेसाओला मैदानावर उतरवले. २१ वर्षीय कॉन्सेसाओने निर्णायक योगदान देताना ९२व्या मिनिटाला विजयी गोल नोंदवला. कॉन्सेसाओप्रमाणेच बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या पेड्रो नेटोने डाव्या बाजूने चेंडू गोलच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. त्याने मारलेला चेंडू चेक प्रजासत्ताकचा बचावपटू रॉबिन हर्नाकच्या पायाला लागून गोलच्या अगदीच समोर असलेल्या कॉन्सेसाओकडे गेला आणि त्याने चेंडू गोलजाळ्यात मारण्यात कोणतीही चूक केली नाही.

हेही वाचा >>>T20 World Cup: केन विल्यमसनने देशासाठी खेळणं का सोडलं?

या विजयी गोलपूर्वी मात्र पोर्तुगालला चेक प्रजासत्ताक संघाने चांगलेच झुंजवले. उत्तरार्धात ६२व्या मिनिटाला लुकास प्रोवोडने गोल नोंदवत चेक प्रजासत्ताकला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. मात्र, ६९व्या मिनिटाला रॉबिन हर्नाककडून झालेल्या स्वयंगोलमुळे पोर्तुगालने १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर कॉन्सेसाओने भरपाई वेळेत गोल नोंदवत पोर्तुगालला विजय मिळवून दिला.

रोनाल्डोचा विक्रम : पोर्तुगालच्या ख्रिास्तियानो रोनाल्डोने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. रोनाल्डो यंदा कारकीर्दीतील सहाव्या युरो स्पर्धेत खेळत असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. युरो स्पर्धेत सर्वाधिक सामने (२६) आणि सर्वाधिक गोल (१४) हे विक्रम आधीच रोनाल्डोच्या नावे आहेत.