दोहा : ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत पोर्तुगालने घानावर ३-२ अशी मात केली. पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर उत्तरार्धात दोन्ही संघांनी उत्कृष्ट आक्रमक खेळ केला. ह-गटातील या सामन्यात पोर्तुगाल सहज विजय मिळवेल अशी सर्वाना अपेक्षा होती. मात्र, घानाने पोर्तुगालला विजयासाठी अखेपर्यंत झुंजवले. ६५व्या मिनिटाला तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीच्या साहाय्याने गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ आठ मिनिटेच टिकली. कर्णधार आंद्रे आयूने गोल करून घानाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
यानंतर पोर्तुगालकडून गोलचे प्रयत्न सुरू झाले. ७८व्या मिनिटाला जाओ फेलिक्स आणि ८०व्या मिनिटाला राफाएल लेयाओ यांनी अप्रतिम गोल करत पोर्तुगालला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. या दोन्ही गोलसाठी निर्णायक पास ब्रुनो फर्नाडेसने केला होता. परंतु पिछाडीवर पडल्यानंतरही घानाने हार मानली नाही. ८९व्या मिनिटाला ओस्मान बुकारीने केलेल्या गोलमुळे घानासाठी बरोबरीच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांना तिसरा गोल करण्यात अपयश आले आणि पोर्तुगालने स्पर्धेची विजयी सुरुवात केली.