‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्षपद काही महिन्यांपूर्वी मला मिळाले, तेव्हा मंडळाची प्रतिमा सावरण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. ते कार्य समर्थपणे केल्यामुळे आता बीसीसीआयचे उपाध्यक्षपद मला मिळाले. हा माझ्यासाठी आणि एमसीएसाठी आनंदाचा क्षण आहे. आम्ही कुणाकडेही ते मागितले नव्हते, ते सन्मानाने देण्यात आले आहे, हे मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. परंतु काही व्यक्तींना ते आवडले नसेल,’’ अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रवी सावंत यांनी व्यक्त केली. याचप्रमाणे आता १८ ऑक्टोबरला होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाने भारतीय क्रिकेटमध्ये वादळ उठले असताना अजय शिर्के यांनी जून महिन्यात कोषाध्यक्षपद सोडले होते. तेव्हा त्या कठीण परिस्थितीत ती जबाबदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. बीसीसीआयची प्रतिष्ठा जपत सावंत यांनी या वर्षीचा लेखापरीक्षण अहवाल पूर्ण केला. चेन्नईत नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पश्चिम विभागाकडील उपाध्यक्षपद सावंत यांना देण्यात आले. याबाबत सावंत म्हणाले, ‘‘उपाध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना संपूर्ण देशाच्या क्रिकेटचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. भारतातील पंचांच्या दर्जाबाबत बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. त्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या स्थानिक स्पध्रेचा नवा कार्यक्रम आधीच जाहीर केला आहे. त्यामुळे पंचांचे वेळापत्रक आखणे यंदा कठीण जाणार नाही.’’
बीसीसीआयच्या निवडणुकीनंतर आता एमसीए निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. याविषयी सावंत म्हणाले, ‘‘आता एमसीएच्या निवडणुकीचे आव्हान आमच्यासमोर असेल. लवकरच आमच्या बाळ म्हाडदळकर गटाची घोषणा करण्यात येणार आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा