वानखेडे स्टेडियमवर मुंबईचे रणजी जेतेपद काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. संघ जिंकतो, तेव्हा साऱ्या चुकांकडे डोळेझाक केली जाते आणि हरतो तेव्हा काय आणि कुणाचे चुकले, याची समीक्षा. पराभवाचे खापर फोडण्यासाठी मग व्यक्ती आणि कारणे. भारतातील क्रीडासंस्कृतीसाठी यात नवखे काहीच नाही. ४० वेळा मुंबईने रणजी विजेतेपद जिंकले, या इतिहासाचा वेध घेतला तरी उपांत्यपूर्व फेरीतील हार तमाम मुंबईकरांच्या जिव्हारी लागणारी आहे. परंतु मुंबई ही वर्षांनुवष्रे क्रिकेटची पंढरी मानली जाते, इथे गुणवत्तेची खाण आहे, हे विचार आता मागे पडत चालले आहेत. झारखंड, जम्मू आणि काश्मीरसारखे अनेक छोटे-छोटे संघ बलवान होत चालले आहेत. त्यामुळे गुणवत्तेची मक्तेदारी फक्त मुंबईकडे नाही, हे सत्य आता मुंबईने स्वीकारायला हवे.
मुंबईने या हंगामाच्या पूर्वार्धात छान कामगिरी केली, परंतु उत्तरार्धात मात्र रडतखडत गाडी रुळावर आली. मुंबईने गतवर्षी रणजी विजेतेपद पटकावले, परंतु त्याच्या आधीच्या दोन वर्षांत मुंबईची वाटचाल बाद फेरीपर्यंतच मर्यादित राहिली होती. मुंबईने या हंगामातील साखळी फेरीतील ८ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले, ३ सामने अनिर्णीत राखले, तर एकमेव सामना गमावला. मुंबईचा हंगामाचा प्रारंभ हा हरयाणाविरुद्ध झाला. परंतु सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील तो अखेरचा रणजी सामना ठरला. क्रिकेटमधील या महान सम्राटाने दुसऱ्या डावात झुंजार खेळी साकारत अनपेक्षित विजयाची भेट मुंबईकरांनी दिली. या अनपेक्षितपणाने मग अखेपर्यंत मुंबईची सोबत केली. पंजाबविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील निर्णायक विजयामध्ये अनुभवी वसिम जाफर आणि विशाल दाभोळकरच्या फिरकीने महत्त्वाची भूमिका बजावली. मग मुंबईत वानखेडेवर सचिनोत्सवाची कसोटी सुरू असताना वांद्रे-कुर्ला संकुलात दिल्लीविरुद्धची लढत अनिर्णीत राहिली. परंतु पहिल्या डावात दोन्ही संघांची धावसंख्या समान झाल्यामुळे दोघांच्या पदरी प्रत्येकी एकेक गुण पडला. या सामन्यात जाफरला साथ मिळाली ती आदित्य तरेची. याचप्रमाणे सिद्धेश लाडने आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. विदर्भाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात जाफर, तरे आणि अजिंक्य रहाणे यांनी शतके साकारली. मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळेच मुंबईला सहा गुण वसूल करता आले. झारखंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात मुंबई हरणार असेच चित्र दिसत होते, परंतु जेमतेम पराभव टाळल्याने एक गुण खात्यात पडला. सौरभ तिवारीच्या द्विशतकी कामगिरीमुळे झारखंडने त्या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेतली होती. ओडिशाविरुद्धच्या सहाव्या सामन्यात मुंबईने जाफर आणि हिकेन शाहच्या शतकांच्या बळावर पाचशे धावा उभारून मग फॉलो-ऑनही दिला. परंतु ओडिशाचा नीरज बेहेरा खेळपट्टीवर समर्थपणे उभा राहिला आणि मुंबईला फक्त तीन गुणांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर कर्नाटकविरुद्ध मुंबईने सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे अखेरच्या सामन्यात गुजरातविरुद्ध विजय मिळवणे मुंबईसाठी अनिवार्य ठरले. मुंबईचे खरे चित्र या सामन्यातच स्पष्ट झाले. मुंबईचा पहिला डाव फक्त १५४ धावांत आटोपला. दुसऱ्या डावातही मुंबईच्या फलंदाजांची धाव मर्यादित ठरली. त्यामुळे गुजरातपुढे विजयासाठी १७५ धावांचे आटोपशीर लक्ष्य होते. परंतु सुदैवाने अनुभवी फिरकी गोलंदाज इक्बाल अब्दुल्लाच्या फिरकीने मुंबईला तारले आणि गंगेत घोडे न्हाले. मुंबईने २९ गुणांसह गुणतालिकेतील अखेरच्या स्थानावर नाव कोरत बाद फेरी गाठली.
महाराष्ट्राविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आरामात जिंकू, असा विश्वास मुंबईला होता. पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मुंबईकडे आली, त्या वेळी त्याची पोचपावतीही मिळाली. परंतु झहीर संघाला जिंकून देईल, या विश्वासापोटी वानखेडेवर रचण्यात आलेला हिरव्यागार खेळपट्टीचा सापळा मुंबईच्या अंगलट आला. दुसऱ्या डावात मुंबईचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फक्त १२९ धावांत कोसळला. मग केदार जाधव आणि विजय झोल यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक विजयाचा अध्याय रचला.
अजित आगरकरने हंगाम सुरू होण्याआधीच निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव गाठीशी असलेल्या झहीर खानकडे मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले. मुंबईच्या गोलंदाजांना आता चांगले पाठबळ मिळेल, हा विश्वास सार्थही ठरला. परंतु फलंदाजीच्या बाबतीत मात्र मुंबईचा ढिसाळपणा वारंवार प्रकट होत राहिला. सचिन, आगरकर जसे मुंबईकडे नव्हते. तसेच फिक्सिंग प्रकरणात बंदीची शिक्षा भोगणारा अंकित चव्हाण, राजस्थान संघात सामील झालेला रमेश पोवार हे मुंबईकडे नव्हते. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांची उणीव तीव्रतेने जाणवत होती. याचप्रमाणे धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, सिद्धेश लाड आणि हिकेन शाह यांच्यामागे दुखापतींचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे मुंबईला दुसऱ्या फळीनिशीच अखेपर्यंत लढावे लागले. कारकिर्दीच्या सूर्यास्ताकडे वाटचाल करणाऱ्या जाफरने मात्र सर्व सामन्यांत खेळून तीन शतके आणि एका अर्धशतकासह मुंबईची फलंदाजीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. आदित्य तरे, हिकेन शाह, सिद्धेश लाड आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली, तर शार्दूल ठाकूरने आपल्या दुसऱ्याच हंगामात वेगवान माऱ्याचा भार समर्थपणे उचलला. विशाल दाभोळकरच्या फिरकीने मुंबईच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका साकारली. परंतु इक्बाल अब्दुल्लाला मात्र फक्त तीनच सामन्यांत संधी मिळाली.
ज्या दिवशी मुंबईच्या रणजी वाटचालीपुढे पूर्णविराम मिळाला, त्याच सायंकाळी मुंबईने आधीच्या हंगामासाठीचा देशातील सर्वोत्तम संघाचा किताब जिंकला. याचप्रमाणे मुंबईचा संघ सांघिकदृष्टय़ा अपूर्ण भासत होता, हे वास्तव आपल्याला स्वीकारायला हवे. महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती, फलंदाज आणि गोलंदाजांचे संघातील बदल हे सारे घटक मुंबईची कामगिरी खालावण्यासाठी कारणीभूत ठरले. चालू हंगामात सर्वच वयोगटांमध्ये मुंबईचा संघ अपयशी ठरला आहे. त्यामुळे एखादे वर्ष असते वाईट असा विचार करून मुंबई पुढे जाणार की समिती वगैरे नेमून आत्मपरीक्षण करणार, हे येणारा काळच ठरवील.

Story img Loader