‘हम कसम खाएंगे, खंदे से खंदा मिलाएंगे.., या गाण्याने एकेकाळी मुंबईच्या रणजी संघाला संजीवनी दिली होती, संघात चैतन्य निर्माण केले होते आणि त्या जोरावर विजयाचा अवघड पेपरही मुंबईने सोडवला होता. पण यंदाच्या हंगामात मात्र मुंबईचा संघ परीक्षेमध्ये बसला खरा, पण गेल्या वर्षी अव्वल आलेल्या मुंबईवर या वेळी नापास होण्याची पाळी आली. कुठलीही सांघिक गोष्ट म्हटली की त्यामध्ये समन्वय, सातत्य आणि सूत्रबद्धता महत्त्वाची असते आणि नेमक्या याच गोष्टींचा अभाव मुंबईच्या संघात जाणवला. या संघामध्ये ‘खडूस’पणाचा लवलेशही दिसला नाही. पैसा, प्रसिद्धी आणि ग्लॅमर या विश्वामध्ये मुंबईचे बहुतांशी खेळाडू मश्गुल राहिले आणि मैदानात मात्र त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजांनी धावा केल्या, गोलंदाजांनी विकेट्स मिळवल्या, पण त्यामध्ये सातत्य आणि समन्वय नव्हते आणि याचाच फटका मुंबईला बसला.
फलंदाजीमध्ये गेल्या मोसमात अभिषेक नायरने चमकदार अष्टपैलू कामगिरी केली होती, त्याला बीसीसीआयचा पुरस्कारही मिळाला होता. पण या वर्षी मात्र त्याच्याकडून त्या दर्जाची कामगिरी पाहायला मिळाली नाही. सहा सामन्यांमध्ये १९च्या सरासरीने त्याने फक्त २०५ धावा केल्या आणि ८ बळी मिळवले. खेळाडू म्हणून हंगामात आणि कर्णधार म्हणून एका सामन्यात त्याला छाप पाडता आली नाही. त्याचे काही निर्णय अनाकलनीय होतेच, पण संघावर त्याची जरब नव्हती. त्याचे काही निर्णय एकांगी असल्याचे संघातील काही खेळाडूंनी सांगितलेही, तो काही सामने जायबंदी झाल्यामुळे खेळू शकला नाही. ही जखम शारीरिक होती की मानसिक, हेदेखील गुलदस्त्यातच आहे.
यंदाच्या मोसमात फलंदाजीमध्ये आदित्य तरेच्या मुंबईकडून सर्वाधिक ५८९ धावा असल्या, तरी त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य नव्हते. त्याने विदर्भविरुद्ध खेळताना १७२, तर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात १२२ धावांची खेळी साकारली खरी, पण मोसमातील अखेरच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट थंडावल्याचेच दिसले. यष्टीरक्षणामध्येही त्याच्याकडून काही झेल सुटले आणि याचा परिणाम संघावर झाला.
वसिम जाफर हा खरे तर मुंबईच्या फलंदाजीचा कणा, पण या मोसमातील तीन सामन्यांत कर्णधारपद भूषवताना त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ओडिशाविरुद्ध १४३, विदर्भविरुद्ध १३९ आणि पंजाबविरुद्ध १११ अशी तीन शतके त्याने झळकावली खरी, पण जेव्हा अडचणीच्या वेळी संघाला त्याची गरज होती, तेव्हा त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळाली नाही.
सूर्यकुमार यादवने यंदाच्या मोसमात पाचशे धावांचा उंबरठा ओलांडत मधल्या फळीतील आपली जागा पक्की केली असली तरी त्याच्यावर कायम भरवसा ठेवता येईल, असे चित्र नाही. त्याच्या फलंदाजीमधला आततायीपणा कमी झालेला या वेळी पाहायला मिळाला. महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने १२० धावांची कणखर खेळी साकारली खरी, पण या मोसमात त्याला सातत्य राखता आले नाही. सूर्यकुमारसारखीच काहीशी अवस्था डावखुऱ्या हिकेन शाहची होती. ओडिशाविरुद्धची १७० धावांची आणि झारखंडविरुद्धची अर्धशतकी खेळी वगळता त्याला चमक दाखवता आली नव्हती. या वर्षी थोडासा अनुभव गाठीशी असलेल्या कौस्तुभ पवारकडून मुंबईला जबरदस्त अपेक्षा होत्या खऱ्या, पण या मोसमातील पहिले काही सामने वगळता त्याच्या बॅटमधून धावा आटल्या असल्याचे पाहायला मिळाले. कांगा लीगमध्ये द्विशतक झळकावत संघात पुनरागमन करणाऱ्या सुशांत मराठेला झारखंडविरुद्धच्या दोन्ही डावांत भोपळाही फोडता आला नव्हता, तर दुसऱ्या ओडिशाविरुद्धच्या सामन्यात त्याला फक्त २७ धावा करता आल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणाऱ्या सिद्धेश लाडला या वेळी शतकाने हुलकावणी दिली असली तरी, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ७४, ८५ या दोन महत्त्वपूर्ण खेळींसह मुंबईचा संघ जेव्हा कर्नाटकविरुद्ध संकटात सापडला असताना त्याची ९३ धावांची अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. अनुभवी विनीत इंदुलकरची महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातील ८२ धावांची खेळी संघाच्या धावसंख्येला आकार देणारी ठरली.
गोलंदाजीमध्ये विशाल दाभोळकरने सर्वाधिक ३९ बळी मिळवत कामगिरीत सातत्य दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. प्रवीण तांबेच्या पदार्पणाच्या सामन्यात मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी चार झेल सोडले होते, त्यामुळे त्याच्या नावावर जास्त बळी दिसले नाहीत आणि आकडेवारीच्या जोरावर त्याला जास्त संधी मिळाली नाही. इक्बाल अब्दुल्लाने मात्र संधीचा चांगला फायदा उचलला. गुजरातविरुद्धच्या अखेरच्या आणि अटीतटीच्या सामन्यात संघात पुनरागमन करताना त्याने दोन्ही डावांत मिळून ११ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पण महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याला कमी षटके का दिली, हेदेखील अनाकलनीयच होते. शार्दुल ठाकूर आणि जावेद खान या गोलंदाजांनी नक्कीच आपला काहीसा प्रभाव पाडला. शार्दुलने विदर्भ, कर्नाटक आणि महाराष्ट्रविरुद्धच्या पहिल्या डावात भेदक मारा केला, या मोसमात त्याने २७ बळी तर जावेदने या हंगामात २४ बळी घेतले.
झहीर खानने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन केले. त्याचा मारा भेदक होताच, पण संघातील युवा गोलंदाजांनाही त्याचे चांगले मार्गदर्शन मिळाले आणि त्याचा चांगला परिणाम संघाच्या गोलंदाजीवर झाला. ५ सामन्यांमध्ये त्याने १९ बळी मिळवले. एक कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी त्याची कामगिरी चांगली झाली होती. मुंबईने चारपैकी तीन सामने जिंकले होते, पण महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात मात्र त्याचे नेतृत्व प्रभावी वाटले नाही. त्याचबरोबर सौरभ नेत्रावळकर, अकबर खानसारख्या नवोदित गोलंदाजांनाही या वेळी संधी मिळाली, पण त्यांना छाप पाडता आली नाही.
सत्तर, ऐंशी, नव्वदीच्या दशकात भारतीय संघात मुंबईचे सर्वाधिक खेळाडू असायचे, पण भारतीय संघ दौऱ्यावर असताना संघाच्या दुसऱ्या फळीने सामने जिंकवून दिल्याचे अनेक दाखले देता येतील. सध्या मुंबईकडे अशी दुसरी फळीच दिसत नाही, याचे चिंतन निवड समिती, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापन आणि पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने व्हायला हवे. सध्याच्या युवा खेळाडूंना ‘खडूस’पणाचे बोधामृत पाजण्याची आणि  खेळाडूंमधला अहंपणा दूर करण्याची गरज आहे. जर या गोष्टी झाल्या नाहीत तर मुंबईचा संघ आपले गतवैभव गमावून बसेल आणि दर्दी मुंबईकरांना जुन्याच आठवणींमध्ये रममाण होणे भाग असेल.                                        (समाप्त)             

Story img Loader