Power cut in New Zealand vs Pakistan 3rd ODI Viral Video : पाकिस्तानचा फलंदाज तय्यब ताहिर न्यूझीलंड विरोधातील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात अगदी थोडक्यात बचावल्याचे पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान जेव्हा पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती तेव्हा अचानकच स्टेडियमवरील वीज पुरवठा खंडित झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे सगळीकडे अंधार झाला. जेव्हा वीज गेली तेव्हा तैयब ताहिर हा स्ट्राइकवर होता तर वेगवान गोलंदाज जॅकब डफी हा गोलंदाजी करत होता. डफीने चेंडू फेकला आणि बरोबर त्याच वेळी स्टेडीअमवरील फ्लड लाइट्स बंद झाल्या. सगळीकडे अंधार पसरला आणि फंलदाज ताहिर हा क्रीज सोडून पळताना दिसून आला. या अनपेक्षित घटनेमिळे काही काळासाठी कमेंटेटर देखील चक्रावल्याचे पाहायला मिळाले. मात्र गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचे नेमके काय झाले याबद्दल काहीही कळू शकले नाही.
नेमकं काय झालं?
माउंट मानुगाउई येथील बे ओव्हल मैदानात पाकिस्तानच्या डावादरम्यान ३९व्या ओव्हरमध्ये जॅकब डफी हा तय्यब ताहिर याला गोलंदाजी करण्यासाठी धावत आला, यावेळी ताहिरने स्टान्स देखील घेतला, मात्र डफीने चेंडू टाकला आणि अगदी त्याच क्षणाला वीज गेली आणि संपूर्ण स्टेडियम अंधारत बुडाले. या अंधारात ताहिर क्रीज सोडून मागे पळताना दिसून आला. चेंडू विकेटकिपरकडे गेला पण अंधारात तो त्याने पकडला कि सोडून दिला हे मात्र दिसले नाही.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पण या घटनेवेळी कुठलाही अपघात झाला नाही. अंधार झाल्याने या चेंडूमुळे ताहिरला इजा होण्याची शक्यता होती, पण ताहिरने ऐनवेळी क्रीज सोडल्याने त्याला कुठलीही दुखापत झाली नाही. या सामन्यात ताहिरने ३१ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. दरम्यान चालू सामन्याच्या मध्येच स्टेडियमवरील दिवे अचानक बंद झाल्याच्या या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियवार लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

पाकिस्तानची लाजीरवाणी कामगिरी

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाची खराब कामगिरी तिसऱ्या वनडे सामन्यात देखील पाहायला मिळाली. न्यूझीलंडने या सामन्यात पाकिस्तानला ४७ धावांनी पराभूत केले. याबरोबरच न्यूझीलंडने वनडे सीरीज ३-०ने जिंकली आहे. याआधी न्यूझीलंडने टी२० सीरीज ४-१ ने जिंकली आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा शनिवारी खेळवण्यात आला. पावासाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ४२ ओव्हर्समध्ये ८ विकेट गमावून २६८ धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार मायकल ब्रॅसवेलने सर्वाधिक ५९ आणि रियस मारियू याने ५८ धावा केल्या. तर पाकिस्तानी संघात अकीफ जावेदने सर्वाधिक ४ विकेट आणि नसीम शाहने २ बळी घेतले.

२६५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची सुरूवात चांगली झाली होती. त्यांनी सुरूवातीला २ विकेट्स गमावून ९७ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून बेन सियर्सने ३४ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. तर पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा बाबर आझमने केल्या. त्याने ५० तर मोहम्मद रिझवाने ३७ धावा केल्या. तर अब्दुल्ला शफी आणि तय्यब ताहिर यांनी प्रत्येकी ३३ धावांची खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power cut in new zealand vs pakistan 3rd odi floodlights went off tayyab tahir ran away watch viral video rak