बार्सिलोना क्लबसाठी गोलांचा सपाटा लावणारा लिओनेल मेस्सी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मात्र अपयशी ठरतो, अशी टीका त्याच्यावर गेली काही वर्षे सातत्याने होत होती. पण या वर्षी त्याने देशासाठी तब्बल १२ गोल झळकावून १९९८मध्ये बॅटिस्टुटा यांनी रचलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली.
मार्च २००९ ते ऑक्टोबर २०११ या कालावधीत मेस्सीला १६ सामन्यांत गोल करण्यात अपयश आले होते. त्यात फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेतील सात, विश्वचषक स्पर्धेतील पाच आणि कोपा अमेरिका स्पर्धेतील चार सामन्यांचा समावेश आहे. १५ महिन्यांपूर्वी सर्जीओ बॅटिस्टा यांच्याकडून अलेजान्ड्रो सबेला यांनी अर्जेटिनाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली आणि मेस्सीच्या जादुई खेळाची पर्वणी अर्जेटिनावासीयांनी अनुभवली. मेस्सीने आतापर्यंत अर्जेटिनासाठी ३१ गोल केले असून दिएगो मॅराडोना यांच्यापेक्षा तो तीन गोलांनी मागे आहे. हेर्नान क्रेस्पोने ५० तर बॅटिस्टुटाने ५६ गोल रचले आहेत. हे सर्व विक्रम मेस्सी २०१४च्या विश्वचषकापर्यंत मोडून काढण्याची शक्यता आहे.

Story img Loader