अव्वल क्रमांकाच्या लढाईसाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या उत्कंठावर्धक पहिल्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी. पहिला धक्का लवकर बसल्यावर अलव्हिरो पीटरसनचे अर्धशतक आणि हशिम अमला व जॅक कॅलिस या भरवशाच्या फलंदाजांनी शतकाकडे कूच केली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर २ बाद २५५ अशी मजल मारली आहे.
नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या (६४) रूपात पहिलाच धक्का २९ धावांवर बसला. पण यानंतर धावांची टांकसाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हशिम अमला आणि पीटरसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्याला शांत केले. पण अर्धशतक झळकावल्यावर पीटरसन जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही, फिरकीपटू नॅथन लिऑनने काटा काढला. यानंतर ऑस्ट्रेलियाला दिवसभरात एकही आनंदाचा क्षण अनुभवता आला नाही. कारण अमला आणि कॅलिस या दोघांनी दर्जेदार फलंदाजीचा नमुना पेश करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले आणि त्यांची गोलंदाजी बोथट केली.
अमलाने संयमी फलंदाजी करत २०७ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ९० धावांची खेळी साकारली, तर कॅलिसने अमलापेक्षा आक्रमक खेळ करत १३५ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८४ धावांची खेळी साकारली.   

Story img Loader