* इंग्लंड-हरयाणा क्रिकेट सराव सामना
इंग्लंड आणि हरयाणा यांच्यातील सराव सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी ११ फलंदाजाना बाद करत गाजवला. हरयाणाच्या गोलंदाजांनी उपाहारापूर्वीच इंग्लंडच्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना हरयाणाला दिवसअखेर चार फलंदाज गमावत १७२ धावा करता आल्या. दुसऱ्या दिवशी समित पटेल आणि हरयाणाच्या सन्नी सिंग व राहुल दिवान यांना अर्धशतके पूर्ण करता आली असली तरी एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही.
सचिन राणाने खेळपट्टीवर पाय रोवू पाहणाऱ्या इयान बेलला (६२) दुसऱ्या दिवशी जास्त काळ फलंदाजीचा सराव करण्याची संधी दिली नाही. बेल गेल्यावर समित पटेल आणि मॅट प्रायर (४१) या जोडीने पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. पण प्रायरला बाद करत जयंत यादवने ही जोडी फोडली आणि त्यानंतर इंग्लंडच्या डावाला घरघर लागली. पटेलने बाद होण्यापूर्वी १३ चौकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी साकारली. प्रायर बाद झाल्यावर अर्धशतक झळकावणारा पटेललाही यादवने बाद केले आणि इंग्लंडचा डाव ५२१ धावांमध्ये तंबूत परतला. हरयाणाकडून अमित मिश्रा आणि यादवने प्रत्येकी चार बळी मिळवले. इंग्लंडने यावेळी अखेरचे पाच फलंदाज फक्त १४ धावांमध्ये गमावले.
फलंदाजीसाठी उतरलेल्या हरयाणाला पहिलाच धक्का २८ धावांवर बसला खरा, पण त्यानंतर सन्नी आणि दिवान यांनी अर्धशतके झळकावत इंग्लंडच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यापासून दूर ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण सन्नीला पटेलने ट्रॉटकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली, सन्नीने ११ चौकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी साकारली. सन्नी बाद झाल्यावर हरयाणाने दोन फलंदाज झटपट गमावले, पण एक बाजू संयमीपणे खिंड लढवत राहिला तो दिवान. शांतपणे फलंदाजी करत १८१ चेंडूंत दिवानने १० चौकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा हरयाणाची ४ बाद १७२ अशी अवस्था होती.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ११८.२ षटकांत सर्व बाद ५२१ (केव्हिन पीटरसन जखमी निवृत्त ११०, समित पटेल ६७, इयान बेल ६२; अमित मिश्रा ४/६७, जयंत यादव ४/११०)
हरयाणा : ६१ षटकांत ४ बाद १७२ (राहुल दिवान खेळत आहे ७७, सन्नी सिंग ५५; टीम ब्रेसनन २/४७)
दुसरा दिवस गोलंदाजांचा !
इंग्लंड आणि हरयाणा यांच्यातील सराव सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी ११ फलंदाजाना बाद करत गाजवला. हरयाणाच्या गोलंदाजांनी उपाहारापूर्वीच इंग्लंडच्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला.
First published on: 10-11-2012 at 01:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Powerful day of ballers