हिकेन शाह आणि रोहित शर्मा या मधल्या फळीतील फलंदाजांनी झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. मुंबईने पहिल्या दिवसअखेर २ बाद ३२५ अशी धावसंख्या उभारली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर कौस्तुभ पवार (१) याला मुंबईने स्वस्तात गमावले. मोहम्मद खादेर याने चौथ्या षटकात त्याला पायचीत पकडले, पण आदित्य तारे आणि हिकेन शाह यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हैदराबादच्या गोलंदाजांना वरचढ होण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचतानाच त्यांनी एकेरी-दुहेरी धावांसह चौकारही वसूल केले. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आदित्य धावचीत झाला. आदित्यने नऊ चौकारांसह ६२ धावांची खेळी केली.
उपाहारानंतर मुंबईला दुसरा धक्का बसला तरी त्यानंतर हिकेनने रोहित शर्माच्या साथीने संपूर्ण दिवसभर खेळपट्टीवर ठाण मांडले. या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांना विकेट मिळविण्यासाठी संघर्ष करायला लावला. हिकेन आणि रोहित जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २०३ धावांची अभेद्य भागीदारी रचल्यामुळे मुंबईला हैदराबादवर वर्चस्व गाजवता आले. या दोघांच्या सुरेख खेळीमुळेच मुंबईला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. हिकेनने १७ चौकारांसह नाबाद १५४ धावा फटकावल्या. रोहित शर्मा नऊ चौकार आणि तीन षटकारांसह १०२ धावांवर खेळत आहे.
मुंबईची दमदार सुरुवात
हिकेन शाह आणि रोहित शर्मा या मधल्या फळीतील फलंदाजांनी झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. मुंबईने पहिल्या दिवसअखेर २ बाद ३२५ अशी धावसंख्या उभारली आहे.
First published on: 25-11-2012 at 02:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Powerful start of mumbai