प्रो कबड्डी लीगद्वारे यंदाच्या मोसमात नव्वद लाखांपेक्षा जास्त मानधनाची बोली खेळाडूला लाभली आहे. पुढील मोसमात कोटय़धीश खेळाडू म्हणून तीन-चार खेळाडूंना किंमत मिळेल, असा आत्मविश्वास पाटणा पायरेट्स संघातील परदीप नरवालने व्यक्त केला. गतविजेत्या पाटणा संघाचे नेतृत्व करण्याची संधी प्रदीपला लाभली आहे.
यंदा या लीगमधील अनेक खेळाडूंना गतवर्षीच्या तुलनेत किमान १५ ते २० टक्के जास्त मानधन लाभले आहे. नितीन तोमरला सर्वाधिक ९३ लाख रुपयांची बोली लाभली आहे. खेळाडूंच्या वाढत्या किमतीविषयी प्रदीप म्हणाला, ‘‘प्रो लीगमधील सामन्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. तसेच सामन्यांच्या थेट प्रक्षेपणास भरपूर प्रेक्षक मिळत आहेत. त्याचप्रमाणे अनेक सामन्यांच्या पुनर्प्रक्षेपणाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. आम्हालाही एखाद्या सिनेकलाकाराप्रमाणेच प्रसिद्धीचे वलय मिळाले आहे.’’
प्रभावशाली चढाईपटू म्हणून ख्याती असलेल्या प्रदीपने यंदा चढाईमधील गुणांचे अर्धशतक पहिल्या चार सामन्यांमध्येच पूर्ण केले आहे. त्याबाबत तो म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी संघातील पकड करणाऱ्यांची शैली कशी आहे, त्यांचा कोणता खेळाडू भक्कम व ताकदवान आहे हे पाहून मी त्यानुसार चढाईचे नियोजन करीत असतो. सुदैवाने माझ्या नियोजनानुसार आतापर्यंत घडले आहे.’’
इराण व दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी केलेल्या प्रगतीविषयी प्रदीप म्हणाला, ‘‘इराणच्या खेळाडूंनी पकडीमधील तंत्र चांगल्या पद्धतीने विकसित केले आहे. फाझल अत्राचेली, अबजोर मिघामी हे दोन्ही दोन बाजूंवरील हुकमी खेळाडू म्हणून खूप चांगली झेप घेत आहेत. त्यांच्यामुळे गुजरात फॉच्र्युन जाएंट्स संघाने पकडीबाबत आपली ताकद वाढविली आहे. शारीरिकदृष्टय़ा दोघांकडे प्रतिस्पर्धी खेळाडूला चौडय़ात पकडण्याची शैली असल्यामुळे पुढे मागे हे खेळाडू भारतीय संघास आव्हानात्मक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराण व कोरियन खेळाडूंच्या वाढत्या प्रगतीबाबत भारतीय खेळाडूंनी घाबरण्याचे कारण नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांना जसा अनुभव मिळतो तसा आम्हालाही त्यांच्या शैलीविषयी गृहपाठ करण्याची संधी मिळत आहे. सुदैवाने प्रो लीगमध्ये आमच्याही शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता वाढविण्याचा पाया रचला जातच असतो. आता आशियाई किंवा जागतिक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे सराव शिबीरही होत असते. शिबिराच्या वेळी प्रशिक्षकांबरोबरच फिजिओ, ट्रेनर, मसाजिस्ट, आहारतज्ञ आदी सपोर्ट स्टाफही असतो. हे लक्षात घेता परदेशी संघांच्या आव्हानास समर्थपणे तोंड देण्याची ताकद भारतीय खेळाडूंमध्ये आहे.’’
मॅटमुळे खेळाडूंना लवकर दुखापतींना सामोरे जावे लागते. त्याविषयी प्रदीप म्हणाला, मातीच्या तुलनेत मॅटवर दुखापतींचे प्रमाण अधिक आहे हे मी कबूल करतो. मात्र अशा दुखापती होणार नाहीत याची काळजी करणे शक्य असते. संघाबरोबर वैद्यकीय तज्ज्ञ असतो. त्याच्या मदतीने याबाबत योग्य सल्ला घेत पूरक व्यायाम केला तर दुखापती टाळता येऊ शकतात.