कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्तेजक पदार्थाविरोधी लवादाने १८ महिन्यांची बंदी घातली आहे. अॅनाबोलिक स्टेरॉइड या बंदी असलेल्या उत्तेजकाचे सेवन केल्याप्रकरणी सांगवान दोषी सापडला होता.
दिल्लीचा २३ वर्षीय क्रिकेटपटू सांगवानवरील बंदी मे महिन्यापासून म्हणजेच आयपीएल चालू झाल्यापासून लागू होईल. बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे की, ‘‘बीसीसीआयच्या उत्तेजक पदार्थविरोधी धोरणानुसार १ ऑक्टोबर २०१३ला प्रदीप सांगवान हा खेळाडू लवादासमोर हजर राहिला होता. त्यानुसार लिखित निर्णय १८ ऑक्टोबरला आम्हाला मिळाला.’’
‘‘सांगवानने उत्तेजकांविरोधातील बीसीसीआयच्या कलम २.१चे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने स्टॅनोझोलोच या प्रतिबंधित उत्तेजक पदार्थाचे अवशेष त्याच्या नमुन्यांमध्ये आढळले आहेत,’’ असे बीसीसीआयने म्हटले आहे.
‘‘चरबी कमी करण्याच्या उद्देशाने मी व्यायामशाळेतील मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार या स्टेरॉइड पदार्थाचे सेवन केले होते,’’ असे सांगवानने लवादासमोर सांगितले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफनंतर उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळलेला सांगवान हा आयपीएलमधील दुसरा खेळाडू आहे.
प्रदीप सांगवान कोण आहे?
ल्ल  २००८मध्ये युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात सांगवानची कामगिरी महत्त्वाची होती.
ल्ल  आयपीएलच्या मागील दोन हंगामांमध्ये सांगवानने कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनितिधत्व केले. सहाव्या मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराजयर्स हैदराबाद या दोघांविरुद्ध सामने खेळला. पण त्याला एकही बळी मिळाला नाही. २००८ ते २०१० या कालखंडात त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले.
ल्ल  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सांगवान याने ३८ सामन्यांत १२३ बळी घेतले आहेत.