कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर २०१९च्या युवा (२० वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचे स्वप्न रंगवत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष गिआनी इन्फॅन्टिनो यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यशाचे भरभरून कौतुक करताना त्यांनी युवा स्पर्धेचे यजमानपद मिळेलच अशी ग्वाही देण्याचे कटाक्षाने टाळले. फिफा परिषदेसाठी इन्फॅन्टिनो भारतात आले असून कोलकाता येथे त्यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष वेधले. या वेळी त्यांनी भारतासह भविष्यातही काम करत राहणार असल्याचे सांगितले.

‘‘कुमार विश्वचषक स्पर्धेने नव्या विक्रमांसह निर्णायक यश मिळवले आहे. भारत हा केवळ एक देश नसून एक खंड आहे. त्यामुळे त्याला ‘फुटबॉलचा देश’ असे संबोधण्यापेक्षा ‘फुटबॉलचा खंड’ असे म्हणणे योग्य ठरेल. या देशातील नागरिकांनी ज्या प्रकारे विश्वचषक स्पर्धेला डोक्यावर घेतले, हे उल्लेखनीय होते,’’ असे इन्फॅन्टिनो म्हणाले.

भारताला या स्पर्धेचे यजमानपद देण्याचा निर्णय योग्य असल्याचा उच्चार त्यांनी केला. या यशानंतर भारताला २०१९च्या युवा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळेल का, या प्रश्नावर सावध प्रतिक्रिया देताना इन्फॅन्टिनो म्हणाले, ‘‘या वर्षी दोन विश्वचषक स्पर्धा आशिया खंडात झाल्या. युवा विश्वचषक स्पर्धा दक्षिण कोरियात आयोजित करण्यात आली होती. २०१९च्या युवा स्पर्धेसाठी अनेक देशांकडून प्रस्ताव आले आहेत. फिफा प्रशासकीय समिती त्यावर अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल.’’

दरम्यान, २०१९च्या स्पर्धेनंतर कुमार विश्वचषक आणि युवा विश्वचषक स्पर्धेचे विलीनीकरण करण्याचा फिफा विचार करत आहे.   या स्पर्धेत ४८ संघ सहभागी होतील.

 

 

Story img Loader