Praggnanandhaa beats World Champion Magnus Carlsen: भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पुन्हा एकदा विश्वविजेता ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं आहे. आजच त्याने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हा पराक्रम केला आहे. मियामी येथे सुरु असणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रज्ञानंदने मॅग्नसवर विजय मिळवला. हा मागील सहा महिन्यांच्या कालावधीमधील मॅग्नसविरुद्धचा तिसरा विजय ठरला आहे. या विजयासहित प्रज्ञानंद या स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर. प्रज्ञानंदची एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेतील विजयाची मालिका शनिवारी खंडित झाली. पाचव्या फेरीच्या लढतीत चीनच्या क्वँग लिएम लीने प्रज्ञानंदला २.५-०.५ अशा फरकाने पराभूत केले. प्रज्ञानंदने या स्पर्धेची अप्रतिम सुरुवात करताना पहिल्या चार फेऱ्यांमध्ये अनुक्रमे अलिरझा फिरौझा, अनिश गिरी, हान्स निमन आणि लेव्हॉन अरोनियन यांच्यावर मात केली होती. पाचव्या फेरीत मात्र त्याला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. या लढतीतील पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर लिएमने दुसऱ्या आणि तिसऱ्या डावात विजयांची नोंद केली.

कार्लसन प्रज्ञानंदविरुद्धचा सामना जिंकेल असं वाटत होतं. मात्र त्याने या सामन्याच्या शेवटाकडे बऱ्याच चुका केल्या. सर्वाधिक गुणांच्या पार्श्वभूमीवर त्याला स्पर्धेचा विजेता जाहीर करण्यात आलं. प्रज्ञानंदने या विजयासहित दुसरं स्थान मिळवलं. या स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसनने जेतेपद पटकावलं असून अवघ्या एका गुणानं प्रज्ञानंदला जेतेपदानं हुलकावणी दिली आहे. प्रज्ञानंदचे १५ तर विजेता ठरलेल्या कार्लसनचे १६ गुण आहेत.

मात्र या पराभवानंतरही खचून न जाता आर. प्रज्ञानंदने दमदार पुनरागमन करत मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा यान-क्रिस्टोफ डुडाने चार डावांमधील २-२ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये २-४ असा पराभव केला होता. मात्र, पाच फेऱ्यांअंती कार्लसन अग्रस्थानी कायम होता. शनिवारी त्यांच्या खात्यावर १३ गुण होते. दुसऱ्या स्थानावरील प्रज्ञानंदचे १२ गुण होते. स्पर्धा संपली तेव्हा कार्लसनचे गुण १६ तर प्रज्ञानंदचे १५ गुण होते. यापूर्वी याच वर्षी प्रज्ञानंदने फेब्रुवारी आणि मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन स्पर्धांमध्ये कार्लसनला धूळ चारली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praggnanandhaa beats world champion magnus carlsen again finishes runner up in ftx crypto cup scsg