भारताच्या बिगरमानांकित एच. एस. प्रणव याने सातव्या मानांकित बुनसाक पोनसाना याच्यावर सनसनाटी विजय नोंदविला आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. पारुपल्ली कश्यप यानेही आव्हान राखले मात्र भारताच्या सौरव वर्मा व के. श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात आले.
प्रणव याने बुनसाक याच्यावर १८-२१, २१-१३, २१-१२ असा विजय नोंदविला. पी.गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्रणव याने पहिली गेम गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. त्याआधी त्याने पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या मायकेल लॅहनस्टेनर याच्यावरही संघर्षपूर्ण विजय मिळविला होता. चुरशीने झालेला हा सामना त्याने १८-२१, २१-९, २१-१२ असा जिंकला.
पाचवा मानांकित कश्यप याने चीन तैपेईच्या हुआन यिस्हुय याचा २१-७, २१-१९ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. कश्यप याला दुसऱ्या गेममध्ये झगडावे लागले. जागतिक क्रमवारीत कश्यप याला नववे मानांकन असून त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
वर्माला इंडोनेशियाच्या दिओनीसिस हायोम रुम्बका या १४ व्या मानांकित खेळाडूने ११-२१, २१-१८, २३-२१ असे चिवट लढतीनंतर पराभूत केले. श्रीकांत याला चौथ्या मानांकित जॉन ओ जॉर्जेन्सन याने १०-२१, २१-१७, २१-१३ असे हरविले.

Story img Loader