सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारताच्या आव्हानाची धुरा सांभाळणाऱ्या पी. व्ही. सिंधूचा जपान खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत आपल्या दर्जाला साजेसा पराक्रम दाखविण्यात अपयश आले. दोन लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या सुपर सीरिज दर्जा लाभलेल्या या स्पध्रेत सिंधूचे आव्हान संपुष्टात आले असताना युवा बॅडमिंटनपटू के. श्रीकांत, अजय जयराम आणि एच. एस. प्रणय यांनी मात्र पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली आहे.
जागतिक क्रमवारीत ५६व्या स्थानावर असलेल्या प्रणयने मागील महिन्यात इंडियन बॅडमिंटन स्पध्रेत सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. आपला तोच आवेश कायम राखत प्रणयने डेन्मार्कच्या जॅन ओ जोर्गनसेन या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील खेळाडूला ५३ मिनिटांच्या लढतीत २१-१४, १३-२१, २१-१७ असे नामोहरम केले.
अन्य लढतीत अव्वल खेळाडूंना पराभूत करण्यासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या श्रीकांतने जवळपास अर्धा तास चाललेल्या लढतीत जपानच्या कझुतेरू कोझायचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला. याचप्रमाणे अजय जयरामने शर्थीने झुंज देत जपानच्या युची इकेडाला २१=१३, ११-२१, २१-१८ असे ५५ मिनिटांत पराभूत केले. आता त्याची गाठ पडेल ती पाचव्या मानांकित टीन मिन नग्युएन (व्हिएटनाम)चा पराभव केला.
तथापि, टोकिया महानगर जिम्नॅशियम येथे झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूचा स्थानिक बॅडमिंटनपटू अकाने यामागुची हिने ३२ मिनिटांत ६-२१, १७-२१ अशा फरकाने पराभव केला. पुरुष दुहेरीमध्ये मनू अत्री आणि सुमीत रेड्डी बी. या जोडीने चीनची चौथी मानांकित अनुभवी जोडी झियाओलाँग लिऊ आणि झिहान क्यूकडून ३६ मिनिटांत १७-२१, १६-२१ अशा फरकाने पराभव पत्करला.
प्रणयची धडाकेबाज कामगिरी लक्ष वेधणारी ठरली. प्रणयने २०१०मध्ये झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पध्रेमधील मुले एकेरी प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर आता त्याची कामगिरी अधिक सुधारली आहे. २१ वर्षीय प्रणयने स्विस खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेत थायलंडच्या बूनसॅक पोन्सानाचा, तर भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत तौफिक हिदायतचा पराभव करण्याची किमया साधली आहे.
अव्वल दहा स्थानांमधून सिंधूची घसरण
जागतिक बॅडमिंटन महासंघाने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने आपले चौथे स्थान कायम राखले आहे. तथापि, भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची दोन स्थानांनी घसरण झाल्यामुळे ती अव्वल दहा स्थानांवरून बाहेर फेकली गेली आहे.
हैदराबादची १८ वर्षीय बॅडमिंटनपटू सिंधूने विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत कांस्यपदक जिंकण्याची किमया साधून गेल्या महिन्यात जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर झेप घेतली होती. परंतु ५१४७२ गुण नावावर असलेल्या सिंधूची १२व्या स्थानावर घसरण झाली आहे.
पुरुष एकेरीमध्येही परुपल्ली कश्यप आणि आरएमव्ही गुरूसाइदत्त यांची अनुक्रमे एक आणि तीन स्थानांनी घसरण झाल्यामुळे ते सध्या १४व्या आणि २३व्या स्थानावर आहेत. याव्यतिरिक्त अजय जयरामची सात स्थानांनी घसरण झाली असून, तो सध्या ३०व्या स्थानावर आहे. तथापि, आनंद पवार, बी. साई प्रणीथ आणि के श्रीकांत अनुक्रमे ३७, ३८ आणि ३९व्या स्थानावर स्थिर आहेत. सौरभ वर्माचीही १० स्थानांनी घसरण झाली असून, तो सध्या ४६व्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा