‘‘प्रो-कबड्डी सुरू व्हायला आठवडा बाकी असताना मला जयपूरकडून खेळायची अनपेक्षित संधी मिळाली. परंतु प्रत्यक्षात खेळायला मिळेल का, ही साशंका सराव सत्राच्या अखेरच्या दिवसापर्यंत मला होती. पण मी जिद्दीने सरावात आपली उपयुक्तता दाखवली. त्यामुळे माझ्यावर प्रशिक्षक आणि संघसहकाऱ्यांचा विश्वास बसला आणि मला संपूर्ण स्पध्रेत कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली,’’ अशा शब्दांत प्रशांतने प्रो-कबड्डीचा प्रवास सांगितला.
प्रो-कबड्डीमुळे आता आपले आयुष्य पालटले आहे, असे प्रशांत अभिमानाने सांगतो. ‘‘तीन वर्षांपूर्वी जेव्हा कबड्डी प्रीमियर लीग खेळलो होतो, तेव्हाच हा खेळ आपल्याला चांगले दिवस दाखवणार याची मला खात्री होती. प्रो-कबड्डीने हे सारे स्वप्न प्रत्यक्षात आणले. आता माझ्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी आणि स्वाक्षरी घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. सोशल मीडियावरही क्रीडारसिकांची दाद मिळत आहे,’’ असे त्याने सांगितले.
संघमालक अभिनेता अभिषेक बच्चनच्या कौटुंबिक जिव्हाळ्याविषयी प्रशांतने आवर्जून सांगितले. तो म्हणाला, ‘‘जेव्हा मी जयपूर पिंक पँथर्सच्या संघात सामील झालो, तेव्हा माझे स्वागत करताना आपण संघ म्हणजे एक कुटुंब आहे, असे सांगितले. आपल्या मोठेपणाचा कोणताही आव न आणता तो आमच्यातलाच व्हायचा. कधी सरावाप्रसंगी स्वत:सुद्धा खेळायचा, तर सामन्याच्या वेळी तो आमची नावे घेऊन आम्हाला प्रोत्साहन द्यायचा. अभिषेकचे हे प्रेम आमच्यासाठी प्रेरणादायी होते.’’
यु मुंबाविरुद्धच्या अंतिम फेरीच्या सामन्याबाबतच्या व्यूहरचनेविषयी प्रशांत म्हणाला, ‘‘मुंबईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आम्ही हरलो होतो. त्यावेळी आम्ही मिळवलेल्या ३१ गुणांपैकी फक्त एक गुण पकडीचा होता. मग आम्ही मुंबईच्या खेळाचा अभ्यास केला. त्यांचे सर्व सामने आम्ही पाहिले. त्यामुळेच क्षेत्ररक्षणावर आधारित व्यूरचना आम्ही आखली आणि ती यशस्वी ठरली.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा