Duleep Trophy 2024, IND A vs IND D: शुबमन गिलच्या संघात आलेल्या प्रथम सिंहने शानदार शतक झळकावले आहे. दुलीप ट्रॉफी २०२४ मधील तिसरा सामना भारत अ आणि भारत ड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत ए संघाचा पहिला डाव २९० धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात भारत ड संघ केवळ १८३ धावा करू शकला. दुसऱ्या दिवशी भारत ए संघाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. सलामीवीर प्रथम सिंह आणि कर्णधार मयांक अग्रवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. मयंक अग्रवाल अर्धशतक झळकावून बाद झाला. मयंक बाद झाल्यानंतरही प्रथम सिंह मैदानावर कायम राहिला आणि तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर त्याने धमाकेदार शतक झळकावले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच प्रथम सिंहने चौकारासह आपले शतक पूर्ण केले. प्रथम १४९ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह शतक पूर्ण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रथमचे हे दुसरे शतक आहे. प्रथम सिंह दुलीप ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या सामन्यात भारत ए संघाचा भाग नव्हता. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिलने मयंक अग्रवालसह भारत ए संघाकडून डावाची सुरुवात केली. मात्र बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शुभमन गिलची निवड झाल्यानंतर प्रथम सिंहचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला.
शुबमन गिलच्या जागी संघात निवड झाल्याने या संधीचे सोने करत प्रथमने उत्कृष्ट कामगिरी केली. या ३२ वर्षीय फलंदाजाने दुलीप ट्रॉफी २०२४ च्या पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले. प्रथमचे दुलीप ट्रॉफीतील हे पहिले शतक आहे. त्याने १८९ चेंडूत १२२ धावांची खेळी खेळली आणि संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली.
शतक झळकावणारा प्रथम सिंह आहे तरी कोण? (Who is Pratham Singh)
प्रथम सिंह हा क्रिकेटपटूसह एक इंजिनीयरही आहे. प्रथम सिंह याने २०१७ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. येत्या आठवड्यात दुलीप ट्रॉफीसाठी संधी मिळण्यापूर्वी त्याने अशा संधीची खूप काळ वाट पाहिली आहे. रेल्वेकडून खेळणाऱ्या प्रथम सिंहने देशांतर्गत क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये १००० हून अधिक धावा केल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यात प्रथमने त्रिपुराविरुद्ध ३०० चेंडूत नाबाद १६९ धावा केल्या होत्या. त्याने आपले पहिले शतक नोंदवण्यासाठी २८ सामने आणि जवळपास सहा वर्षे वाट पाहिली होती. विशेष म्हणजे, प्रथमने आपल्या पहिल्या प्रथम श्रेणी शतकासह विक्रमी कामगिरी केली, ज्यामुळे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च यशस्वी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड रेल्वेच्या नावावर नोंदवला गेला.
गेल्या रणजी मोसमात त्याने १२ डावांत तीन अर्धशतकांसह ५३० धावा केल्या होत्या. प्रथमने २०१९-२० मधील पहिल्या सत्रात सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये सलग चार अर्धशतके नोंदवून लहान फॉरमॅटमध्येही चमकदार कामगिरी केली आहे.
IPL मध्ये या संघाचा भाग
प्रथमने उत्कृष्ट खेळी करत शतक झळकावले. त्याने ४९व्या षटकात विद्वथ कवरप्पाचे षटकार लगावत स्वागत केले आणि त्यानंतर ३ डॉट चेंडूंनंतर शेवटच्या दोन चेंडूंवर लागोपाठ चौकार मारून शतक पूर्ण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळणाऱ्या पहिल्या आयपीएल संघाचाही तो भाग होता. २०१७ च्या आयपीएल लिलावात त्याला गुजरात लायन्सने संघात घेतले पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर, तो आयपीएल २०२२ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स म्हणजेच KKR चा भाग बनला. केकेआरने त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह करारबद्ध केले होते, पण त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.