Praveen Kumar Says Everyone used to tamper with the ball : भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने मोठा खुलासा केला आहे. चेंडूशी नेहमीच छेडछाड केली जाते आणि प्रत्येक क्रिकेटपटू मर्यादेत राहून हे करत असल्याचे त्याने म्हटले आहे. यादरम्यान तो म्हणाला की, पाकिस्तानचे गोलंदाज रिव्हर्स स्विंग करण्यासाठी चेंडूशी जास्त छेडछाड करायचे. १९९० च्या दशकात रिव्हर्स स्विंग हे वेगवान गोलंदाजांसाठी एक मजबूत शस्त्र म्हणून उदयास आले. त्यावेळी पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यात पटाईत होते.
प्रवीण कुमारने ललनटॉपशी येथे संवाद साधताना या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, ‘प्रत्येकजण चेंडूशी थोडीफार छेडछाड करतो. मी ऐकत आलो आहे की पाकिस्तान संघ जरा जास्त करतो. आता अनेक कॅमेरे असले, तरी पूर्वी जेव्हा कमी कॅमेरे होते. तेव्हा बॉल टॅम्परिंगचे प्रमाण जास्त होते. ते सतत चेंडू स्क्रॅच करायचे. पण यासाठी हे कसे घडते हे देखील जाणून घेतले पाहिजे. प्रत्येकजण ते करू शकत नाही. तुम्हाला शिकावे लागेल.’
विशेष म्हणजे ‘बॉल टॅम्परिंग’ची प्रकरणे वेळोवेळी समोर येत आहेत. या प्रकरणी स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद सोडावे लागले. यासाठी स्मिथ आणि वॉर्नरला एका वर्षाच्या बंदीलाही सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीही एकदा चेंडू चघळताना पकडला गेला होता.
का केली जाते चेंडूशी छेडछाड?
जेव्हा चेंडू जुना होऊ लागतो, तेव्हा त्याच्याशी छेडछाड केली जाते. असे केले जाते कारण चेंडूचा एक भाग खराब केल्याने वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगमध्ये खूप मदत होते. छेडछाडमुळे, चेंडू विचित्र पद्धतीने रिव्हर्स स्विंग होऊ लागतो. ज्यामुळे फलंदाजाला अडचणी निर्माण होतात.
हेही वाचा – क्रीडा गुणवत्तेचा सन्मान! अशोका हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने खेळाडूंचा गौरव
आता वनडेतही रिव्हर्स स्विंग दिसत नाही –
आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्विंगची कला नाहीशी झाली आहे. कारण सामन्यादरम्यान दोन्ही बाजूंनी नवीन चेंडूंचा वापर केला जातो. अशा स्थितीत डाव संपेपर्यंत चेंडू जुना होत नाही. यामुळेच आता वेगवान गोलंदाज रिव्हर्स स्विंगवरही लक्ष देत नाहीत. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये ही कला आजही जिवंत आहे.