Paris Paralympics 2024 Praveen Kumar Wins Gold in Men’s T64 High Jump: भारतीय पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकच्या पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. लहान पायांसह जन्मलेल्या प्रवीणने सहा खेळाडूंमध्ये हंगामातील सर्वोत्तम २.०८ मीटर उडी मारली आणि अव्वल स्थान पटकावले. भारताचे हे एकूण २६ वे पदक आहे, तर हे सहावे सुवर्ण आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत नऊ रौप्य आणि ११ कांस्यपदक आली आहेत. प्रवीणचे पॅरालिम्पिकमधील हे सलग दुसरे पदक आहे. यापूर्वी, त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २.०७ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने रौप्य पदक जिंकले होते.
पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीत सुवर्ण जिंकणारा दुसरा भारतीय –
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील प्रवीण मरियप्पन (२१) हा पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा थंगावेलू नंतरचा दुसरा भारतीय पॅरा ॲथलीट आहे. अमेरिकेच्या डेरेक लॉसेंटने २.०६ मीटरच्या उडीसह रौप्यपदक तर उझबेकिस्तानच्या टेमेरबेक झियाझोव्हने २.०३ मीटरच्या उडीसह कांस्यपदक जिंकले. या कामगिरीसह प्रवीण कुमार पॅरिसमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय उंच उडीपटू ठरला. त्याच्या आधी शरद कुमारने रौप्यपदक जिंकले होते, तर मरियप्पनने पुरुषांच्या T63 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
T64 मध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो, ज्यांच्या एका पायाच्या खालच्या भागात हलकी ते मध्यम हालचाल असते. तसेच एक किंवा दोन्ही पाय गुडघ्याच्या खाली नसतात.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदके अशी एकूण १९ पदकांसह ही भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यावेळच्या पॅरालिम्पिकमध्ये जिथे भारताने आतापर्यंत २६ पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. अवनी लखेरा, नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर आणि प्रवीण कुमार यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत. पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर याने १९७२ मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मुरलीकांत पेटकर हे तेच खेळाडू आहे, ज्यांच्या जीवनावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता.