अन्वय सावंत
मुंबई : ‘कॅन्डिडेट्स’मध्ये पाच भारतीय बुद्धिबळपटूंचा सहभाग असला, तरी त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. मात्र, अनुभवाच्या जोरावर कोनेरू हम्पी भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करू शकेल, असे मत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे आणि बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी व्यक्त केले.
प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेला बुधवारी उद्धाटन सोहळय़ासह टोरंटो (कॅनडा) येथे सुरुवात झाली. गुरुवारी पहिल्या फेरीच्या लढती खेळवल्या जातील. यंदाच्या स्पर्धेत खुल्या आणि महिला विभागात मिळून १६ ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचा समावेश असून यापैकी पाच भारतीय आहेत. खुल्या विभागात आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश आणि विदित गुजराथी, तर महिलांमध्ये कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली हे भारतीय आपले आव्हान उपस्थित करतील. ‘कॅन्डिडेट्स’मधील विजेत्यांना जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्यांना आव्हान देण्याची संधी मिळेल.
हेही वाचा >>>संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
‘‘भारताचे पाच बुद्धिबळपटू एकाच वेळी ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळणे हे नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. प्रज्ञानंद, गुकेश आणि वैशाली यांनी आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली असली, तरी ते खूप युवा आहेत. इतक्या वरच्या स्तरावर खेळण्याचा त्यांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. आपले मानांकन सुधारण्यासाठी त्यांना ही स्पर्धा फायदेशीर ठरू शकेल. विदित या स्पर्धेत भारताकडून सर्वात चांगली कामगिरी करू शकेल असे काही महिन्यांपूर्वी वाटत होते. मात्र, त्यानंतर त्याने कामगिरीत सातत्य राखलेले नाही. त्यामुळे सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्याला लय सापडणे आवश्यक आहे. भारताच्या पाच बुद्धिबळपटूंपैकी हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जाऊ शकतील. परंतु हम्पीची तयारी कशी आहे हे पाहावे लागेल. हम्पी खूप उच्च दर्जाची खेळाडू आहे. महिला विभागात कोणत्या एका खेळाडूचे पारडे जड वाटत नाही. त्यामुळे हम्पी चांगली कामगिरी करू शकेल,’’ असे ठिपसे म्हणाले. असेच काहीसे मत गोखले यांनीही व्यक्त केले.
हेही वाचा >>>IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
‘‘हम्पी आता ३७ वर्षांची आहे. जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्र ठरण्याची ही तिची अखेरची संधीही असू शकेल. त्यामुळे ती आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. ‘वयाच्या ३५व्या वर्षांनंतर तुमचा खेळ खऱ्या अर्थाने बहरतो,’ असे माजी जगज्जेता बुद्धिबळपटू अॅनातोली कारपोवा म्हणाला होता. त्यामुळे हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ती सहजगत्या कोणतीही लढत गमावणार नाही असे तिचा इतिहास सांगतो. तिच्या गाठीशी खूप अनुभवही आहे. त्यामुळे ती दर्जेदार कामगिरी करू शकेल,’’ असे गोखले यांनी नमूद केले.
खुल्या विभागात अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना यांना जेतेपदाची सर्वोत्तम संधी असल्याचा मतप्रवाह आहे. ठिपसे आणि गोखले या मताशी सहमत आहेत.
भारतीयांच्या सलामीच्या लढती
’ डी. गुकेश वि. विदित गुजराथी
’ आर. प्रज्ञानंद वि. अलिरेझा फिरूझा
’ आर. वैशाली वि. कोनेरू हम्पी