भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आणखी एक नाव समोर आलं आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुंबईकर खेळाडू प्रविण आमरे यांनी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. भारतीय संघाचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, हे विश्वचषकादरम्यान चुकीच्या कारणासाठी चर्चेत आले होते. उपांत्य सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय बांगर यांनी घेतल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे प्रविण आमरे हे बांगर यांच्या जागेसाठी तगडे उमेदवार मानले जात आहेत.

विश्वचषक स्पर्धेआधी वर्षभर भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्न कायम होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय फलंदाजीचा डाव पुरता कोलमडला होता. प्रविण आमरे यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलं असून, आयपीएलमध्येही ते दिल्लीच्या संघाला मार्गदर्शक म्हणून काम पाहतात.

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे हा नेहमी प्रविण आमरे यांच्याकडून टिप्स घेत असतो. याव्यतिरीक्त आमरे यांनी सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंनाही फलंदाजीचे धडे दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात आमरे संजय बांगर यांना कशी लढत देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader