भरवशाचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर रवीचंद्रन अश्विन व ख्रिस मॉरिस यांनी षटकामागे दहा धावांचा वेग ठेवत चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळविण्यासाठी आटोकाट झुंज दिली मात्र राजस्थान रॉयल्सने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत १४ धावांनी विजय मिळविला आणि चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
विजयासाठीच्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला२० षटकांत ८ बाद १४५ धावा करता आल्या. राजस्थान संघाकडून फिरकीपटू प्रवीण तांबेने केवळ १० धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकांत ८ बाद १५९ धावा केल्या होत्या.
विजयासाठी १६० धावांचे माफक आव्हानास सामोरे जाताना चेन्नईच्या दिगज्ज फलंदाजांची दाणादाण उडाली. मायकेल हसी (९) हा सलामीवीर धावबाद झाल्यानंतर त्यांची घसरगुंडी सुरू झाली. पाठोपाठ मुरली विजय हा केवळ १४ धावांवर धावबाद झाला. फलंदाजीस बढती मिळून आलेला एस. बद्रीनाथ यानेही निराशा केली. केवळ आठ धावांवर तो बाद झाला. राजस्थानकडून खेळणारा मुंबईचा फिरकी गोलंदाज प्रवीण तांबे याने बद्रीनाथ याच्यापाठोपाठ द्वायने ब्राव्हो (३) याला पायचीत केले. दुसऱ्या बाजूने राहुल शुक्लाने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (३) माघारी पाठवून चेन्नईला आणखी एक धक्का दिला. अखेरीस ख्रिस मॉरिस व रवीचंद्रन अश्विन यांनी चेन्नईची घसरगुंडी थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत संघास विजयाच्या सान्निध्यात आणले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
तत्पूर्वी, अजिंक्य रहाणेने दमदार अर्धशतक ठोकूनही राजस्थान रॉयल्स संघास चॅम्पियन्स ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य लढतीत चेन्नईसमोर जेमतेम १६० धावांचे आव्हान ठेवता आले. रहाणेने शैलीदार खेळ करीत ७० धावा केल्या. शेन वॉट्सन याने ३२ धावा टोलविल्या. या दोघांचा अपवाद वगळता रॉयल्सच्या अन्य फलंदाजांना घरच्या मैदानावर चमक दाखविता आली नाही.
संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स – २० षटकांत ८ बाद १५९ (अजिंक्य रहाणे ७०, शेन वॉटसन ३२; ड्वेन ब्राव्हो ३/२६, ख्रिस मॉरिस २/२५) विजयी वि. चेन्नई सुपर किंग्ज – २० षटकांत ८ बाद १४५ (रवीचंद्रन अश्विन ४६, सुरेश रैना २९; प्रवीण तांबे ३/१०).
सामनावीर : प्रवीण तांबे

Story img Loader