Preethi Pal Won First Bronze in Women’s T35 100m Event at Paris Paralympic games 2024: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसऱ्या दिवशी तिसरे पदक मिळाले आहे. प्रीती पाल हिने ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला हे कांस्यपदक मिळवून दिले आहे. पदक जिंकण्यासोबतच प्रीतीने इतिहासही घडवला आहे. तिने महिलांच्या १०० मीटर T35 स्पर्धेत १४.२१ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. पॅरा गेम्समधील ट्रॅक इव्हेंटमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. या पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत महिलांनी भारतासाठी तिन्ही पदके जिंकली आहेत. याआधी अवनी लेखरा आणि मोना अगरवाल यांनी नेमबाजीत पदक जिंकले होते.
हेही वाचा – Paris Paralympics Games 2024: पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराला सुवर्ण; मोना अगरवालला कांस्य
प्रितीने महिलांच्या १०० मीटर (T35) स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १४.२१ सेकंदासह तिसरे स्थान मिळवले आहे. चीनच्या झोउ जियाने सुवर्णपदक जिंकले तर त्याच देशाच्या गुओ कियानकियानने रौप्यपदक जिंकले. झोऊने १३.५८ सेकंद वेळ नोंदवली. प्रीतीचे कांस्यपदक पॅरिस पॅरालिम्पिकमधील पॅरा ॲथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे. पॅरालिम्पिक गेम्समध्ये टी३५ श्रेणी ही पॅरा ॲथलीट्ससाठी आहे ज्यांना हायपरटोनिया, ॲटॅक्सिया आणि एथेटोसिस आणि सेरेब्रल पाल्सी इ. यांसारखे समन्वय विकार आहेत.
प्रीतीची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी
प्रीती पालने १४.२१ सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह शर्यत पूर्ण केली. चीनच्या जिया झाऊ आणि कियानकियान गुओ यांना मागे टाकले. चीनने या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य असे दोन्ही पदक जिंकले. २३ वर्षीय प्रीती प्रथमच पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. या वर्षी मे महिन्यात झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने महिलांच्या २०० मीटर T35 मध्ये कांस्यपदक जिंकले. आता ती पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये २०० मीटर स्पर्धेतही भाग घेणार आहे.
प्रीती पाल या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. तिने मार्च २०२४ मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या ६व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २ सुवर्णपदकं जिंकून वर्षाची चांगली सुरूवात केली. त्यानंतर मे महिन्यात जपानमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक जिंकले. या पदकामुळे ती पॅरिस पॅरालिम्पिकचे तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरली आणि आता तिने कांस्यपदक जिंकून नवा विक्रम केला आहे.