राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाभोवतीच्या वादग्रस्त प्रकरणातून बीसीसीआय सावरत असतानाच इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालक असलेल्या प्रीती झिंटाच्या गौप्यस्फोटाने या स्पर्धेभोवतीचा गैरप्रकारांचा विळखा अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघातील काही खेळाडूंचा सामना निश्चिती प्रकरणात सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा सहसंघमालक प्रीती झिंटाने केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी पथकाला इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील गैरप्रकार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप प्रीतीने केला. आयपीएलच्या कार्यकारिणी समितीची बैठक ८ ऑगस्टला झाली. या बैठकीत प्रीतीने संघातील खेळाडूंच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी माहिती दिली. या बैठकीला आयपीएल फ्रँचाइजी मालकांसह लीगचे चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, खजिनदार अनिरुद्ध चौधरी आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली उपस्थित होते.
यासंदर्भात प्रीतीला संबंधितांना यापूर्वीच माहिती द्यायची होती मात्र हातात ठोस पुरावे नसल्याने ती गप्प राहिली अशी माहिती सूत्रांनी दिली. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे काही सामने निकाल आधीच ठरल्याप्रमाणे सुरू असल्याचे वाटले होते असा खुलासाही प्रीतीने केला. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघांसंदर्भातील न्यायमूर्ती लोढा समितीच्या निर्णयानंतर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठी सुधारणा मोहिमेचा आराखडा तयार केला होता. त्यासाठी फ्रँचाइजी मालकांना उपाययोजना करण्यासाठी सूचित करण्यात आले होते. त्यानुसार आयपीएल संघमालक आणि बीसीसीआयची पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. सामना सुरू असताना काही मंडळी सामन्याच्या निकालाविषयी भाकित वर्तवत आणि ते तंतोतंत खरे ठरत असे. या प्रकारानंतर प्रीतीला संशय आला. मानसशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने लोकांच्या देहबोलीचा अभ्यास करता येतो. वर्तन संशयास्पद वाटणाऱ्या खेळाडूंना रोखल्याचे तसेच त्यांची संघातून हकालपट्टी केल्याचेही तिने सांगितले. ‘‘भ्रष्टाचारविरोधी पथक खेळाडूंना विशिष्ट व्यक्तीबरोबर बोलण्यास रोखू शकते. त्यांच्या वावरावर मर्यादा घालू शकते,’’ असे ती म्हणाली.
दरम्यान बीसीसीआयचे विधी सल्लागार यु.एन. बॅनजी यासंदर्भातील अहवाल २८ ऑगस्टला कोलकाता येथे होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सादर करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा