इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत चेल्सीने आपले वर्चस्व सिद्ध केले. उत्कंठावर्धक लढतीत चेल्सीने लिव्हरपूलवर २-१ अशी मात करत आगेकूच केली.
तिसऱ्याच मिनिटाला लिव्हरपूलतर्फे मार्टिन स्कर्टेलने सलामीचा गोल केला. मात्र लिव्हरपूलची आघाडी फार काळ टिकली नाही. इडन हॅझार्डने १७व्या मिनिटाला गोल करत चेल्सीला बरोबरी करून दिली. ३४व्या मिनिटाला चेल्सीतर्फे इटोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांमध्ये गोलसाठी जोरदार मुकाबला रंगला. मात्र चेल्सीने लिव्हरपूलचे आक्रमण थोपवण्यात यश मिळवले आणि विजय मिळवला.
 या पराभवामुळे वर्षांअखेरीस लिव्हरपूलला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजयामुळे चेल्सीचा संघ तिसऱ्या स्थानी स्थिरावला आहे. एप्रिल २०१२नंतर लिव्हरपूलने पहिल्यांदाच साखळी गटाच्या सलग दोन लढती गमावल्या आहेत.
ऑलिव्हर ऑड्सच्या एकमेव गोलच्या जोरावर अर्सेनेलने न्यूकॅस्टल संघावर १-० असा विजय मिळवला. ऑलिव्हरने हंगामातील ११वा गोल करताना अर्सेनेलला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून दिले. फ्रान्सच्या ऑलिव्हरने ६५व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केला. अर्सेन वेगनर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या अर्सेनेलला या सामन्यात विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला.
अर्सेनेलच्या जोरदार आक्रमणाला शिताफीने रोखत न्यूकॅस्टलने चांगली वाटचाल केली. सामना संपायला काही मिनिटे असताना न्यूकॅस्टलच्या खेळाडूंनी गोलसाठी आणि पर्यायाने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांचे हे प्रयत्न अपुरेच ठरले. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे मेसुट ओझिल या सामन्यात खेळू शकला नाही.