PM Narendra Modi On Shooter Manu Bhaker wins bronze medal : भारताची नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. तसेच मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदकही पटकावून दिले आहे. या विजयानंतर आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनू भाकेरचं अभिनंदन केलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मु्र्मू म्हणाल्या, मनू भाकेरने नेमबाजीमध्ये कास्य पदक जिंकत परिस ऑलिम्पिकमधील भारताच्या पदकांचे खातं उघडलं आहे. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. संपूर्ण भारताला तिच्यावर गर्व आहे. तिच्या यशानंतर अनेकांना विशेषत: महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल. मी तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते.
हेही वाचा – पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती ‘मनू भाकेर’च्या लहानपणीचे फोटो व्हायरल, शाळेपासूनच होती नेमबाजीची आवड; पाहा फोटो
पंतप्रधान मोदींकडूनही कौतुकाचा वर्षाव
याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामगिरीबद्दल मनू भाकेरचं अभिनंदन केलं आहे. हे एक ऐतिकाहासिक पदक आहे. मनू भाकेरच्या विजयाबद्दल मी तिचं अभिनंदन करतो. हा विजय आणखी विशेष होतो, जेव्हा नेमबाजीत भारताला पदक जिंकून देणारी ती पहिली महिला ठरते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.
२२१.७ गुणांसह जिंकलं कांस्य पदक
दरम्यान, भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. मनू भाकेरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले आहे. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.
हेही वाचा – Manu Bhaker : मनू भाकेरच्या वडिलांनी तिच्यासाठी सोडली होती नोकरी, ‘या’ खेळांमध्येही आहे पारंगत, पाहा फोटो
मनू भाकेर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनू भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनू मागे राहिली.